अजून देखील केसरवर्खी
सूर्य जरासा दिसतो आहे
चांदण पेरीत आकाशातून
चंद्र जरासा हसतो आहे
अजून देखील कातरकापी
सांज वेंधळी कुढते आहे
नक्षत्रांच्या अनवट लतिका
बांधून मांडव सजतो आहे
अजून देखील थकला रावा
परत कोटरी फिरतो आहे
गाई गुरांचा कळप भागला
कुशल गुराखी वळतो आहे
अजून देखील पाण्यावरती
उंबर अंबर धरतो आहे
काजळ होडीतून नावाडी
जाळे अपुले भरतो आहे
अजून देखील आठव वेणा
देत काळ हा सरतो आहे
आणि इथे ह्या ऐल तीरावर
साजण तुजला स्मरतो आहे
©निखिल मोडक
प्रश्न सुटता सुटता
माय उत्तराची व्याली
प्रसवल्या उत्तरांच्या
प्रश्नचिन्ह शोभे भाळी
लिखित ते ललाटीचे
वाचुनिया फुंदे माय,
"प्रश्न घेऊनी जन्मल्या
उत्तरांचे करू काय?"
प्रश्नांकित उत्तरांची
गाठ घडोघडी पडे
निरुत्तर करणारा
नवा प्रश्न ठाके पुढे
अनादि नि अनंत ही
श्रेढी प्रश्न उत्तरांची
तिच्या अस्तित्वा जोडली
सदा नाळ आयुष्याची
================
उत्तराची माय= तर्कबुद्धी
फुंदे = स्फुंदत बोले
श्रेढी = मालिका; रांग; ओळ;
श्रीनृसिंह अवतार
कडाकडाड खांब तोड फोडुनी धडाडले
अफाट तेज वज्र घाती आसमंत लोपले
विराट गर्जना उठे दहा दिशा निनादली
दणाण पाउले ठसे धराही कंप पावली
लकाक नेत्र ज्वाळ लाल भासले वीजेपरी
सुवर्णी केश दीप्तसे मुखा भले सभोवती
मुखास शार्दुला दिसे नरास ऊग्र लाभता
लळालळाल जीभ ती कराल दंष्ट्री ठाकता
क्षणात दैत्य घेउनि खराखरा निखंदला
भळाभळा रुधिर स्त्राव जीव तो विसावला
----------------------------------------------
पुढे उभा नमून बाळ भक्तीयुक्त ओंजळी
प्रभो जरा निवांत व्हा प्रशांतवी ह्रदीतळी
नभाची निळी निळाई
रवी केशर खलवी त्यात
पानांची सळसळ गोड
झुलवीत फुटे पहाट!!
दिवसा लख्ख प्रकाशी
उरतो ना एकही रंग
फुटतात पाय वाटेला
जीवनात जीवन दंग!!
संध्येची धूसर छाया
बिलगते मनाला थोडी
करतात प्रश्न नव्याने
गतकाळातील कोडी!!
कोण अलगद रात्री
चांदण्या पेरूनी जाते
पांघरुन चमचम शेला
पात्र नदीचे निजते!!
स्वप्नात भास-आभास
सांगतात जीवन हे रे
तुज जगायचे नव्याने
उघडून मनाची दारे!!
मी मानसी
वेदनादायी क्षणांना सण म्हणावे लागले
सलत्या जखमांस हसुनी व्रण म्हणावे लागले ॥
विखरून गेले दान जे झोळीत होते घेतले
राहिल्या काही कणांना धन म्हणावे लागले ॥
मानले मी रूख त्यांच्या सावल्या करपून गेल्या
पेटत्या उरल्या उन्हाला वन म्हणावे लागले ॥
केला तयांनी यत्न वेडा मूर्त ही घडवावयाचा
राहिल्या दगडास मजला मन म्हणावे लागले॥
द्यायचे आता न मजला राहिले कोणास काही
राहिल्या हास्यास तरिही ऋण म्हणावे लागले ॥
©निखिल मोडक
सारं गतिमान झालंय हल्ली...
त्यामुळे तोल जातो माझा
भरधाव वेगानं कुणीतरी समोरून जातं...
आणि मग बाचकायला होतं!
'विसावा' घेणं म्हणजे,
पळण्याच्या शर्यतीत विसावा आल्याचं भासतं!
मग मी देखील पळतो...
अगदी ऊर फुटेस्तोवर, धावत सुटतो
विक-डेज ला गावं शहरांकडे पळतात...
अन विकेन्ड ला शहरं गावांकडे
मधे आहेत फक्त भरधाव धावणारे रस्ते...
अन त्यासाठी भरावे लागणारे टोल!
पडवीत आडवा होऊन, वाचायला घेतलेलं पुस्तक...
ते तसंच पडून आहे कधीचं
फडफडताहेत ती केवळ वाचलेली पानं...
न वाचलेलं तसंच, चहाच्या कपाखाली बंदीस्त
"माहिती आणि अधिकार"
आजकाल सगळ्यांत जास्त भीती वाटते
ती,
अंगावर धावून येणाऱ्या माहितीची.
कधी पूर आलेल्या ,
नदीसारखी बुडवून गुदमरुन टाकते.
तर कधी ,
अचानक भिरभिरत येणाऱ्या
वादळासारखी चक्रावुन टाकते.
कधी तप्त उन्हात ,अंगाची लाही लाही
करते.
तर कधी ,
अवकाळी पावसासारखी
अचानक कोसळून भिजवून टाकते.
समाज माध्यमातुन कधी खरी तर कधी खोटी!
टेली व्हिजन वहिन्यांमधुन अतिरंजीत , बटबटीत,
नी मेंदुला झिणझिण्या आणणारी.!
"सखी"
उड्या मारत चिऊताई अंगणात आली .
अन म्हणाली ,
उरले नाही मला घरदार .
जागा शोधुन मी दमले फार.
झाडं नाहीत की जंगल नाही .
घर बांधायची काही सोयच नाही .
छोटीशीच जागा शोधली प्रयत्नाने ,
त्यावरही कब्जा केला त्या 'काळ्या ' कावळ्याने .
कधी मिळते ,
पण गावापासून फार दूर असते.
दाणापाणी जमवून आणताना जीवाला फार दमवते .
कधी बांधकामाच्या साईटवर मिळतो एखादा कोपरा .
मात्र ,मजूर उचलून फेकतात घराला, समजून कचरा .
................सुत्रधार.............
गांभीर्यपूर्ण हास्य मी
अन् गहन रहस्य मी
कल्लोळपूर्ण शांती मी
अनंताप्रतची भ्रांती मी
थंड शीत ज्वाळ मी
न् सर्वनाशी काळ मी
शास्त्र मी न् शस्त्र मी
अधर्मभेदी अस्त्र मी
जहाल कडवा सर्प मी
मधुर विषारी दर्प मी
तांडवी रूद्र मी
बलिष्ठ वीरभद्र मी
भयाण,रौद्र,शांत मी
न् खल विदीर्ण अंत मी
गूढ, विषण्ण नाद मी
युगांतरीची साद मी
धैर्य मी धारिष्ट्य मी