तुझ्या अबोल्याचा किती त्रास झाला
घरात होतो तरी वनवास झाला?
क्षण निरोपाचे होते जीवघेणे
सुरु परदेशी जसा प्रवास झाला
अबोली अंगणात बहरून आली
अजाणता तुझा तो सहवास झाला
तिथे माळलास तू गजरा कदाचित
अंतरात माझ्या हा सुवास झाला
तू तोडलास बांध मौनाचा तुझ्या
उरात मोकळा माझा श्वास झाला
काय म्हणावे या नशिबाला, जुळण्या आधी तुटल्या तारा
शीड बांधणे बाकी होते, तोवर सुटला सुसाट वारा
उंच किती या भीषण लाटा, लढतो आहे सागर सारा
भरकटलो मी वाट हरवलो, दिसतो आहे कुठे किनारा ?
काडी काडी जोडून कसा, उभारलेला छान निवारा
वादळ आले उडून गेला, उरला खाली फक्त पसारा
मतलबी साऱ्या दुनिया मध्ये, कोण कुणाला देतो थारा ?
सरली आहे सगळी आशा, आता केवळ तुझा सहारा
आज पहाटे पहाटे
ओलांडून स्थळकाळ
साकारले माझ्यापुढे
बालपणीचे आजोळ
मामा मावशी प्रेमळ
हात आजीचा सढळ
आजोबांच्या भूपाळीत
उगवतीचे आभाळ
पेरू फणसाच्या मधे
कृष्णकमळीचा वेल
पायरहाटाच्या मागे
धरे सावली पोफळ
कधी पारावर गप्पा
कधी बालिश भांडणे
रात्री चांदण्या मोजत
अंगणातले झोपणे
कधी नदीत डुंबणे
कधी नांगर धरणे
करवंदे तोडताना
काटे बोथटून जाणे
तान्ह्या पाडसांची शिंगे
चाचपडून बघणे
आठवडी बाजारात
निरुद्देश भटकणे
रुळलेल्या वाटेवर कावळ्यांचे झाड बदनाम आहे
वेशीकडे जाणारा वळणाचा नकाशा इनाम आहे
मिटलेल्या डोळ्यांमध्ये स्वप्न असे बेफाम आहे
गारव्यात पहाटेच्या हा अंधार बेलगाम आहे
गर्दीतल्या गारद्यांचा कोरडा आकांत आहे
क्षितीजाच्या पलीकडे वाटे कोलाहल शांत आहे
पोथीतल्या काजव्यांना प्रकाशाचा शाप आहे
रोजच्या तहानेला पाणवठा अश्राप आहे
हरलेल्या मनात सुखाच्या उत्तराचे शल्य आहे
धावणाऱ्या पारध्यांचे थांबलेले बाल्य आहे
फसलेल्या सावकारांचा हा गोरख पंथ आहे
प्रवास हा माझ्यातून माझ्याकडे संथ आहे
आता आताच कुठे मी
आता आताच कुठे मी उभी होते सावलीस
आता आताशा सुगंध होता माझ्या ओंजळीस
आता आता ओठी होते माझ्या पावसाचे गाणे
आता आताशी मला मी जरा भेटली नव्याने
आता आता म्हणताना कधी पालटली पाने
आता आता म्हणताना किती उलटली उन्हे
आता आताचे सोनेरी दूर लकाकती क्षण
आता आता च्या सयांनी कसे भरावे गं मन?
द्वैत
माथ्यावरची आठी अलगद पुसून गेली बहुधा
कवितेमधली ओळ शहाणी सुचून गेली बहुधा
खिसा रिकामा केला त्याने चौकामध्ये सारा
डोळ्यांमध्ये भूक मुलांच्या दिसून गेली बहुधा
घरा भोवती तिच्या रोज तो मारत होता चकरा
जाता जाता वळून मागे हसून गेली बहुधा
लिपस्टिक लाली घेण्यासाठी घाई घाई गेली
तारुण्याची लाट अचानक सुकून गेली बहुधा
कोरा कागद ,ठसा, अंगठा वाड्यावरती गेला
पोर तयाची सासर गावी रडून गेली बहुधा
आकाशी तो सोडत होता पिंजऱ्यातले पक्षी
स्वातंत्र्याची त्याला किंमत कळून गेली बहुधा
महाराष्ट्राच्या कुरूक्षेत्रावर
पुन्हा राजकारण घडत आहे.
आणखी एक धुर्तराष्ट्र आपल्याच पुतण्याला डावलण्यासाठी धडपडत आहे.
( ही वाक्ये चारोळीचे अनभिषीक्त सम्राट श्री रामदास फुटाणे महोदयांना समर्पित )
ही चारोळी माननीय रामदास फुटाणे यांना का समर्पित केली याचे कारण.
कै देविलाल आपल्या मुलाला मुख्यमंत्री ( ओमप्रकाश चौटाला याला ) बनविण्यासाठी धडपडत होते. या दरम्यान झालेल्या निवडणूक मधे हत्या झाल्या या पार्श्वभूमीवर श्री रामदास फुटाणे यांची चारोळी होतो.
महाभारताच्या कुरूक्षेत्रावर आणखी
एक महाभारत घडत आहे.
प्रेम...! काय असत प्रेम?
उरात भरणारा प्रत्येक श्वास म्हणजे प्रेम
जिवलगाचा लागलेला निरंतर ध्यास म्हणजे प्रेम
काळजात दरवळणारा अल्लड गंध म्हणजे प्रेम
स्नेहाच्या धाग्यांचा मखमली बंध म्हणजे प्रेम
चिंब भिजवणाऱ्या जिव्हाळ्याच्या धारा म्हणजे प्रेम
मनातल्या आठवणींचा असलेला किनारा म्हणजे प्रेम
त्याने पाहावं,आणि तिने लाजावं म्हणजे प्रेम
तिने बघावं आणि त्याने घायाळ व्हावं म्हणजे प्रेम
त्याने श्वास घ्यावा आणि हृदयात ती उतरावी म्हणजे प्रेम
तिने डोळे मिटावे आणि फक्त तो दिसावा म्हणजे प्रेम
दाही दिशांना होता अंधार,अन्
आशा विझुन गेली होती
जिवंत होतं काळीज,पण
स्पंदने बुजून गेली होती
अंधार ओकत होता चंद्र
रात्र जीवावर आली होती
अंधारल्या डोहात त्या
सावलीही परकी झाली होती
तुफानवारा सुटला होता
भयाण शांती भरली होती
चार पावलांसाठीसुद्धा
मी वादळवाटच धरली होती
तोच आकाशी आवाज उठला
आशेलाही पाझर फुटला
रात्र शमली वैऱ्याचीही
साती अंबरी सुगंध सुटला
ग्रहणाचाही काळोख सरला
भयाण अंधकारही विरला
आकाशही नितळून आले
आता केवळ प्रकाश उरला
वादळवाटेवरतीसुद्धा सूना मोगरा मोहरून आला