रान ओढा
उन्हाळ्यात पार आटलेला
पांढ-याफट्ट चेह-याचा ओढा
शेतावर रुसल्यागत
हूप्प बसतो खरा
पण स्वत:वरच रागावतो
फणफणतो, काढतो राग
वाळू, दगड, गोटे तापवून
काठावरची झाडंही खंततात
याच्या काळजीनं, हा काही बोलत नाही म्हणून
एरवी पावसाळ्यात किती खळखळाट
आता कंठ रुध्द झालाय त्याचा
पाणथळीतल्या पाखरांच्या गाण्यावाचून
गाईम्हशीच्या न्हाण्यावाचून
डोहात अर्धवट सोडलेल्या नाजूक पायावाचून
बैल पाण्यावर आल्यावर ऐकलेल्या गोड शीळेवाचून
झुकलेलं निळं आभाळही
कुठंच दिसत नाही
© दत्तात्रय साळुंके