तू पुरूषाच्या यशामागचे कारण म्हणुनी
स्तुती तुझी गाण्याचे आता थांबवेन मी
तुझी भरारी तुझ्या यशाचे श्रेय जाणुनी
सलाम करुनी माझे कौतुक दाखवेन मी
माता म्हणुनी त्याग तुझा मी जरी जाणतो
त्या त्यागाचा गौरव नुसता करू नये मी
साथ देऊनी त्रास कमी तो करुन बघावा
त्या त्यागाचे कारण नुसते बनू नये मी
सुंदरतेची तुझ्या कौतुके गाण्यापेक्षा
सांगावे मी दिसण्याला या महत्व नसते
जशी घडवली त्याने तशीच युनीक आहे
तुला कळावे हरेक स्त्री ही सुंदर असते
माता भगिनी पुत्री भार्या या नात्यांनी
तुझी कौतुके इतक्यावर ना भागवेन मी
तू असण्याचा उत्सव तुझ्याच साठी व्हावा
स्वतंत्र अस्तित्वास तुझ्यात्या ओळखेन मी
अपुल्या इच्छा अपुली स्वप्ने फळण्यासाठी
किती कितीदा तुला असे मी गृहित धरावे
मनात आता एकच इच्छा उरली आहे
जगामधे या तुला स्वतःचे स्थान मिळावे
तुष्की नागपुरी
नागपूर, ०८ मार्च २०१९
(ही कविता जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्वदूर प्रकाशीत एका इंग्रजी संदेशाचा स्वैर अनुवाद आहे, तो संदेश इतक्या जागी प्रकाशित आहे की त्याचा लेखक लेखिका माहीती नाहीत)