कवितेच्या ओळी चार
अलंकार ना उपमा
रुपक ना विलक्षण
उपदेश नाही कुणा
जीवनाचे तत्त्वज्ञान
दुर्बोध ना अतर्क्यसे
कृष्ण विवर भेदून
गूढ अगम्य ना तेथ
डोळे जाती विस्फारून
स्वैर निसर्गात दिसे
मन मोहकशी खूण
चित्त तरंग थांबले
एकरुप तेचि क्षण
मनी ओघळत आल्या
कवितेच्या ओळी चार
लख्ख लख्खसे होऊन
क्षणी निवाले अंतर
मीही रडलो आहे पुस्तक वाचून
पण आता आठवत नाही... की कुठलं
बहुदा तो कुठलासा वृत्तांत होता
पात्र ज्यात अनेको होती..
चारी बाजूंनी भिरभिरत यायची
वाचत जायचो अन् रडत रहायचो मी.
क्षणभरात साहजिक समजलं की वाचतो काही वेगळं
रडतो काही वेगळं...
दोन्ही जुळून गेलंय.
वाचणं पुस्तकाचं
अन् रडणं माझ्या व्यक्तित्त्वाचं!
पण मी जे वाचलं होतं त्यावर नव्हतो रडलो
वाचण्याने तर मला रडण्याची ताकत दिली!
मी दु:ख मिळवलं होतं बाहेर... पुस्तकी जीवनाच्या...
वाचत जायचो अन् रडत जायचो मी!
बोलणे लोक मी सोडले आता
जाहल्या चुकांना खोडले आता
चोळले मीठच जखमेवर ज्यांनी
लोक माझेच मी तोडले आता
बांधले घर ते वाळूचे होते
सागराने कसे मोडले आता
साठवण्यात सारे जगणे सरले
साठवले घट ते फोडले आता
दुःख देवा काही उरले नाही
चरणी तुझ्याच मन जोडले आता
भरजरी दिसाया कात्री खिशाला
असे सोहळे का करावे कशाला?
ख्याती कधीचीच गेली लयाला
अश्या या अवेळी उरावे कशाला?
लबाडी जो तो करी जिंकायाला
खुशीने उगा मी हरावे कशाला?
पिऊनि अमृता अमर कैक झाले
विषारी दंश मी पत्करावे कशाला?
गोडीत ज्यांनी जिव्हारी वार केले
त्यांनाच देऊ अता पुरावे कशाला?
अंधारात ज्यांनी ढकलले तळाला
उजेडात त्यांनी सावरावे कशाला?
मांडता मांडता कुणी डाव साधला
असे पसारे मी आवरावे कशाला?
असे प्रश्न सारे अन अशी उत्तरे ही
घोकलेले कधीचे स्मरावे कशाला?
नकोच घ्याया दिवास्वप्ने उशाला
डाव अर्धा राहून गेला, आहेस कुठे तू?
चहा थंड होऊन गेला, आहेस कुठे तू?
काडी तुझी, विडी माझी पेटत होती
मस्कापाव वाळून गेला, आहेस कुठे तू?
गाडी माझी, इंधन तू भरणार होतास
गोवा बेत राहून गेला, आहेस कुठे तू?
तुझ्या शकील साहिरचा मी तलत रफ़ी
तप्त स्वर विरून गेला, आहेस कुठे तू?
भेगांमधून हिरवे कोंब फुटू पाहत होते
'अमलताश' गळून गेला, आहेस कुठे तू?
- मंदार.
जरा तुझ्याशी भांडायाचे आहे पण अन् नाही पण
जरा स्वत:शी बोलायाचे आहे पण अन् नाही पण
कुणी ऐकतो मख्खपणे अन् कुणी चघळतो अफवाही
मनातले सल सांगायाचे आहे पण अन् नाही पण
किती ऐकले पोक्त इशारे, टोले, सल्ले प्रेमाचे
फक्त स्वत:चे ऐकायाचे आहे पण अन् नाही पण
करायचे ते केले नाही दिवसा स्वप्ने बहुरंगी
मारुन-मुटकुन सजवायाचे आहे पण अन् नाही पण
जादूच्या ह्या मंचापुढती तर्काचे हे सोंग फुके
जरा-जरासे लपवायाचे आहे पण अन् नाही पण
भाळावरच्या रेषांबद्दल धन्यवाद अन् गार्हाणे
आपण अपुले रेखायाचे आहे पण अन् नाही पण
- मंदार.
"कवितेचं पान" या मधुराणीताईने चालवलेल्या नितांत सुंदर चॅनेलवर एक आशयघन कविता ऐकायला मिळाली. रश्मी मर्डी या कवयित्रीने सुरेख लिहिलीये, आणि गायलीयेही फार अप्रतिम. नक्की ऐका -
"तुला भावणारी" - रश्मी मर्डी (https://youtu.be/DVe2EKZS1nA?t=94)
तुला भावणारी अशी रोज नवखी कशी होत गेले मला ना कळे
किती यत्न केले तुला जिंकण्याचे तरी ना कसे रे तुला आकळे
तुझ्या जाणिवांना जपावे किती सांग मी रोज आतून कोमेजते
आता शांत मी ही हळू होत आहे जशी ज्योत हळुवार मंदावते
प्रायोरीटी
“अगं, इतकं काय मनाला लावून घेतेस तू? हे असं बारिकसं अपयश इतकं महत्त्वाचं नाहीये आयुष्यात. मुलाच्या एखाद्या छोट्याशा परीक्षेपेक्षा खूप काही प्रायोरीइटीज असतात जगात. आणि अजून तर आकाश किती लहान आहे. अशा खूप परीक्षा येतील अजून.” दोन महिन्यांपूर्वी मैत्रिणींनी समजावायचा प्रयत्न केला होता.
मावळत्या शुक्रामागुन
मधुरात्र लाजरी येईल
किरणांना खेळायाला
दंवबिंदू देऊन जाईल
चांदवा - प्रियाचा भास!
बरसेल सखीची प्रीत
हेव्याने धरणी लाविल
चंद्राला काजळतीट
वाळूवर लपलप लाटा
सा-याच खुणा पुसतील
उमटेल पुन्हा आशेने
कधि पाउल संयमशील?
थकलेली पिवळी पाने
गळतील तळ्याच्या काठी
आरक्त-धवल शोकाकुल
प्राजक्त मूक सांगाती
तुज अलगद आठवताना
मन गवतफुलांचे होईल
हुरहूर - मधाचा ठेवा!
त्या फूलपाखरा देईल