* दिली पावसाने हाळी *
दिली पावसाने हाळी
रोमांचले रंध्र रंध्र
धरा कस्तुरीचा फाया
पसरला मृदगंध...
दिली पावसाने हाळी
ऊब भिनली गात्रात
नखशिखांत शहारे
मोती नदीच्या पात्रात...
दिली पावसाने हाळी
पिसाटला रानवारा
ओले घरटे; पाखरू
शोधी आडोसा निवारा...
दिली पावसाने हाळी
हरखल्या वृक्ष वेली
पोरसवदा धरती
आज न्हातीधुती झाली...
चिंब पावसात सखी
उभे निथळे लावण्य
मन भरतीची लाट
देह पेटले अरण्य...!
***
ती दिसावी सांजवेळी
मोजताना तारका
वेग यावा स्पंदनांना
जन्म झाल्यासारखा
ना कळावे लोचनांना
हे खरे की भास हा?
गंध ओला दरवळावा
मोगऱ्याचा त्या पुन्हा
प्रीतवेडी अंतरीची
मेघ वाहे साजिरा
जाऊ पाहे त्यापुढे हा
एक पक्षी पांढरा
वेळ जाणे कोणतीही
कोणताहा सोहळा
हाक येई त्या दिशेने
देह माझा चालला
सागरतीरी..
तो लाल केशरी गोळा
बुडे जळी हळूवार..
अन् क्षितीजावरती रंग
पसरी काळाशार..!!
ती तांबड-लाली विरता
तम कणाकणाने दाटे..
सभोवार मग अवघा
तिमिराकृतीत गोठे..!!
दूर किनारी पुढे
खडकांवर लाटा फुटती..
पाण्यात उभे केलेले
मचवे शिडांसह डुलती..!!
चंद्रमा उगवता नभी
मेघकडा रुपेरी होती..
अन् डचमळणाऱ्या लाटा
चांदीचा वर्ख मिरविती..!!
रात्र गडद होताना
कोलाहल हळूहळू विरतो..
वाळूत सैल पसरता
एकांत मनात झिरपतो..!!
मनात माझ्या येते अवखळ
मनात माझ्या येते अवखळ काही बाही
सदा कदा ते शोधत जाते, खुळेच पाही
मूल होऊनी बागडते ते अंगणदारी
फुलपाखरे शोधीत बसते सांज सकाळी
दुःख उराशी कधी काळचे कुरवाळुनिया
थोपटून ते जागे करते वेळी अवेळी
मधेच शोधे पुढील काही धसकुन जाई
उगाच खंती करता करता गाणे गाई
नित्य नवे हे चाळे निरखित दिवसा राती
किती गुणाचे बाळ म्हणोनि कौतुक पाही
समजाउनिया ऐकत नाही, चापट देई
लांब उभा मी, मनात येवो काही बाही
कितीदा तुज पाहुनी मन माझे झुरावे
कधी तुला गुज माझ्या मनीचे कळावे
का तु समोर येता ओठ माझे मिटावे
का मुखातून माझ्या शब्द ही न फुटावे
का प्रितीच्या फुलाने आपल्या न फुलावे
का फुलण्या आधीच ते कोमेजून जावे
स्वप्नांत अलगद जशी येतेस तू अवचित
आयुष्यात ही माझ्या तू का न तसेच यावे
कितीदा तुझ्या आठवांचे क्षण येता
का डोळ्यांतून माझ्या आसवांनी झरावे
प्रेमात तुझ्या मिळाले फक्त दुःख पदरी
का तरीही मी वेदनेस या बिलगून राहावे
गुरुवार १८/७/२०२४ , ११:०६ PM
अजय सरदेसाई (मेघ)
आठवती ओले पायठसे
मृद्गंध भारली सांज
नभी मेघमृदंगा साथ करी
रिमझिमती पाऊसझांज
नभ तोलून धरल्या क्षितिजाला
झगमगत दुभंगे वीज
ढग पापण्यात दडण्याआधी
अनिमिष जागतसे नीज
सृजनाची हिरवी हाक जरी
भवतालातून दुमदुमते
ओथंबून येता नभ अवघे
अवचितसे दाटून येते
सावळ्या विठूची, प्रीतही सावळी
धरीतो सावली, पित्यापरी
दीपस्तंभापरी, वाट दाखवाया
उभा राही विठू, विटेवरी
लेकराची चूक, पोटात घेऊन
चाले सोबतीने, वाटेवरी
शांतावते मन, पाहून सावळ्या
मायबाप माझा, विठू हरी
मरगटलेला वृक्ष होतो मी
तू चैत्राची पालवी होतीस
आज पुन्हा एकटाच मी
तू सोबत हवी होतीस..
पाणी नव्हते घोटभर जिथे
तू पावसाची धार होतीस,
दुःखाच्या पुरात बुडताना
तूच माझा आधार होतीस,
दुःखात जीवन कंठत होतो
तू सुखाची चावी होतीस,
आज पून्हा एकटाच मी
तू सोबत हवी होतीस..
वाट चूकलेला वाटसरू मी
तूच माझी दिशा होतीस,
वाट तापली उन्हानं तेव्हा;
तू थंडगार निशा होतीस,
जूनाटलेल्या मनास माझ्या
तू झळाळी नवी होतीस,
आज पुन्हा एकटाच मी
तू सोबत हवी होतीस...
* वेणा *
चिंतातूर बळीराजा
दिली पावसाने दडी
यातनांची चंद्रभागा
वाहे भरून दुथडी
गेल्या कधीच्या आटून
नद्या- नाले नि विहिरी
नको वाटे गळाभेट
दिंड्या पताका ना वारी
थेंब थेंब पाण्यासाठी
माती माय आसुसली
वेदनेचा जयघोष
कशी खेळू बा पावली
टाळ मृदंगाचा भार
झाले पालखीचे ओझे
उद्या तुझी एकादशी
आज ठेवलेले रोजे
रान भासे वाळवंट
गेले करपून पीक
रडे तुका नामा जनी
अगतिक पुंडलिक
विलक्षणाच्या उभ्या पिकावर
देण्या खडा पहारा
पाहिजेत जे - भेदू शकतील
स्थळकाळाची कारा
पाहिजेत ते - नेणीव ज्यांची
जाणिवेतुनी झरते
अर्थगर्भ मौनातही ज्यांचे
रोमरोम रुणझुणते
पाहिजेत जे - उत्स्फूर्तीच्या
पुष्करणीचे पाणी
पिऊनी खोदतिल अमूर्तावरी
अकल्पिताची लेणी
पाहिजेत जे - अज्ञेयावर
कलम करुनी ज्ञाताचे
विलक्षणाचे वाण बनवुनी
घेतील पीक उद्याचे