वेणा
* वेणा *
चिंतातूर बळीराजा
दिली पावसाने दडी
यातनांची चंद्रभागा
वाहे भरून दुथडी
गेल्या कधीच्या आटून
नद्या- नाले नि विहिरी
नको वाटे गळाभेट
दिंड्या पताका ना वारी
थेंब थेंब पाण्यासाठी
माती माय आसुसली
वेदनेचा जयघोष
कशी खेळू बा पावली
टाळ मृदंगाचा भार
झाले पालखीचे ओझे
उद्या तुझी एकादशी
आज ठेवलेले रोजे
रान भासे वाळवंट
गेले करपून पीक
रडे तुका नामा जनी
अगतिक पुंडलिक