अशीही संवेदनशीलता – दूरवरील मेघालयातल्या घनदाट जंगलातली

Submitted by Rajesh Kulkarni on 13 December, 2015 - 13:23

gibbon.jpgअशीही संवेदनशीलता – दूरवरील मेघालयातल्या घनदाट जंगलातली
.
मेघालयातून आसाममध्ये रेल्वेगाडी सुरू झाली. या रेल्वेचा काही मार्ग मेघालयातल्या बलपक्रम अभयारण्यामधून (Balpakram National Park) जातो. या अभयारण्यात हुलॉक गिब्बन (hoolock gibbon) नावाची बबून जातीची खाली दिलेल्या छायाचित्रात दिसणारी माकडे आढळतात. या बबून्सचे वैशिष्ठ्य म्हणजे ते कधीही झाडावरून खाली उतरत नाहीत, म्हणजे जमीनीवर येत नाहीत. म्हणजे त्यांना स्थलांतर करायचे झाले तर त्यांच्या वास्तव्यासाठी किती दाट जंगल हवे ते लक्षात येईल.

त्या अभयारण्यातून हा रेल्वे मार्ग करायचा म्हणजे त्यांच्यावर मोठीच संक्रांत आली. कारण त्या संपूर्ण मार्गातील झाडे काढून जवळच्या झाडांच्या फांद्या रेल्वेमार्गात अडथळा आणणार नाहीत अशा पद्धतीने काढल्यामुळे या बबुन्सना झाडावरून उड्या मारून पलिकडे जाणे अशक्य झाले व त्यामुळे रेल्वेमार्गाच्या दोन्हीकडील त्यांच्या भाऊबंदांची ताटातुट झाली.

रेल्वेमार्ग बांधून झाल्यावर काही काळाने ही बाब काही निसर्गप्रेमींच्या लक्षात आली. त्यामुळे या प्रकल्पावरून थोडी टीकाही झाली. यावर मार्ग तर काढायला हवा. मग आपल्या लष्कराने तेथे एक शक्कल लढवली. त्यांनी रेल्वेगाडी विनासायास जाऊ शकेल अशा उंचीचा दोन्हीकडील बाजू जोडल्या जातील असा पूल बांधला. शिवाय नुसता पूल बांधून भागणार नाही, कारण या कृत्रिम गोष्टी या बबुन्सच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत हे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्या पुलावर खरी वाटतील अशी पण कृत्रिम झाडे उभारण्यात आली. त्यानंतर मात्र ताटातूट झालेल्या दोन्ही बाजुंकडील बबुन्सची समजुत पटली व ते त्यांच्या ‘तत्वा’प्रमाणे जमिनीवर न उतरता या मार्गाच्या दोन्ही बाजुंना सुखेनैव संचार करू लागले.

या प्रकरणी निसर्गप्रेमींनी दाखवलेली ही संवेदनशीलता व त्यावरील वर उल्लेख केलेला उपाय या दोन्ही गोष्टी वाखाणण्यासारख्या आहेत. हा प्रदेश अतिशय दुर्गम आहे. तेव्हा या पुलाची छायाचित्रे मिळणे फारच अवघड असले तरी ती कोणाला मिळाल्यास जरूर पाठवावीत.

विकीवरून मिळालेले हुलॉक गिब्बनचे छायाचित्र दिले आहे.
gibbon.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy