मनात माझ्या येते अवखळ
Submitted by पुरंदरे शशांक on 21 July, 2024 - 03:10
मनात माझ्या येते अवखळ
मनात माझ्या येते अवखळ काही बाही
सदा कदा ते शोधत जाते, खुळेच पाही
मूल होऊनी बागडते ते अंगणदारी
फुलपाखरे शोधीत बसते सांज सकाळी
दुःख उराशी कधी काळचे कुरवाळुनिया
थोपटून ते जागे करते वेळी अवेळी
मधेच शोधे पुढील काही धसकुन जाई
उगाच खंती करता करता गाणे गाई
नित्य नवे हे चाळे निरखित दिवसा राती
किती गुणाचे बाळ म्हणोनि कौतुक पाही
समजाउनिया ऐकत नाही, चापट देई
लांब उभा मी, मनात येवो काही बाही