सागरतीरी..
सागरतीरी..
तो लाल केशरी गोळा
बुडे जळी हळूवार..
अन् क्षितीजावरती रंग
पसरी काळाशार..!!
ती तांबड-लाली विरता
तम कणाकणाने दाटे..
सभोवार मग अवघा
तिमिराकृतीत गोठे..!!
दूर किनारी पुढे
खडकांवर लाटा फुटती..
पाण्यात उभे केलेले
मचवे शिडांसह डुलती..!!
चंद्रमा उगवता नभी
मेघकडा रुपेरी होती..
अन् डचमळणाऱ्या लाटा
चांदीचा वर्ख मिरविती..!!
रात्र गडद होताना
कोलाहल हळूहळू विरतो..
वाळूत सैल पसरता
एकांत मनात झिरपतो..!!