काव्यलेखन

गूज पापणीचे सांगू कसे?

Submitted by चंद्रहास शास्त्री on 17 May, 2024 - 11:49

गूज पापणीचे सांगू कसे?
©️ चन्द्रहास शास्त्री

आत ओली बाहेर कोरडी, गूज पापणीचे सांगू कसे
आत जागी नि बाहेर जागी, गूज पापणीचे सांगू कसे

साथ पापणीची निस्स्वार्थ ही, ती फक्त तेवती पणती नसे
बरोबरी तिची कुणास नाही, गूज पापणीचे सांगू कसे

सरींना मुक्त ओघळू द्यावे, तिलाही वाटले असेल असे
इमान तिने मोडले ना कधी, गूज पापणीचे सांगू कसे

विजेने ढगास जपावे तसे, अहंकार माझा जपला असे
एकांती पण ओली होतसे, गूज पापणीचे सांगू कसे

निमिषा, छानच तुझी रे घरटी, स्पन्दनाने होतसे बोलकी
बूज राखून सांगितले असे, गूज पापणीचे सांगू कसे

शब्दखुणा: 

पाऊले चालती … विडंबन

Submitted by ओबामा on 17 May, 2024 - 11:01

मध्यंतरी एका अभिनेत्याची राजकारणावरील कविता खूप गाजली..त्याला उत्तर म्हणून एका काकांची कविता पण कायप्पावर फिरली....आता माझी विडंबन कविता...माझ्यामागे कसले चौकशीचे फेरे लागू नयेत हेच त्या विठ्ठलचरणी मागणे.

पाऊले चालती बीजेपीची वाट
सद्य पक्षाची सोडूनिया साथ

गांजुनिया भारी इडी चौकशीने
पडता हातात बेड्यांची माळ
पाऊले चालती …

अण्णा आबा नेते कार्यकर्ते ते
पाहुनिया सारे फिरविती पाठ
पाऊले चालती …

येता होकार श्री पक्षश्रेष्ठींचा
तसा चौकशीचा व्हावा नायनाट
पाऊले चालती …

उत्खनन

Submitted by पॅडी on 15 May, 2024 - 23:49

* उत्खनन *

थांग मनाचा लागेना
लाख ढवळला तळ
आटलेल्या असोशीला
ऐसे विश्वव्यापी बळ

वठलेल्या वासनांना
पुन्हा नव्याने धुमारे
पुन्हा पान्हावले शब्द
पुन्हा नवेच शहारे..!

मन पाखरू बेफाम
उडे आपुल्या तालात
द्वाड वारा शीळ घाली
ऋतु हासती गालात

संथ वाहत्या धारेला
यावे उगमाचे भान
तशी जागवली कुणी
युगायुगाची तहान ?

पाळामुळाशी भिडता
गेलो चिणून-शिणून
मिळे अक्षरांचे धन
देहा-मनाला खोदून...
***

शब्दखुणा: 

तुझ्या हास्यज्योती

Submitted by चंद्रहास शास्त्री on 14 May, 2024 - 11:19

तुझ्या हास्यज्योती
- चंद्रहास शास्त्री

दाटलेल्या गर्द अंधा-या राती
उजळती तुझ्या हास्यज्योती
भीती काळजी विरून जाती
आशा स्वये पल्लव गीत गाती

सहज तुझे मनोरम हासणे
खुणावते मला पुनश्च जगणे
विसरून तेव्हा मी माझे हारणे
उरते लक्ष्य, एक, हृदय जिंकणे

नभीचे तारांगण तसे सांगते हळुवार
झाडांना, वेलींना, निखिल प्रकृतीला
वसंत पाझरू, बहरू द्या तुम्ही चौफेर
मोहोराचा गंधही असू द्या सोबतीला

शब्दखुणा: 

त्या तरुतळी

Submitted by अनन्त्_यात्री on 14 May, 2024 - 01:59

अशोकाच्या पारावर
सीतामाय उसासते
सोनमृगाच्या मोहाला
मनोमन धि:कारते

शमीवृक्षाचा विस्तार
शस्त्र पार्थाचे झाकतो
प्रत्यंचेला स्पर्शण्यास
शर अधीरसा होतो

वृद्ध बोधिवृक्षातळी
गौतम नि:संग बसे
बोधरवि उगवता
दिव्यप्रभा फाकतसे

अजानवृक्षाच्या तळी
ज्ञानयोगी अविचल
अभावाच्या कर्दमीही
प्रतिभेचा परिमळ

नांदुरकीची डहाळी
आज कशाने हलते?
अणूहुनी सूक्ष्म कोणी
सारे आकाश व्यापते!

कधीतरी वाटतं आजारी पडावं

Submitted by चैतन्य रासकर on 10 May, 2024 - 05:15

कधीतरी वाटतं आजारी पडावं
स्वतःला काय झालंय हे नव्याने कळावं

पालथं झोपून छताकडे बघावं
भिंतीच्या पापुद्रांनी किती ते पडावं

दार उघडं ठेवून शांत झोपावं
स्वप्नात का होईना कोणीतरी गोळी द्यायला यावं

जुनं काही आठवावं स्वतःशी हसावं
असा का वागलो हे स्वतःला विचारावं

मागच्या गोष्टीचं काही दुःख नसावं
आपल्याला काहीही झालेलं नाही हे नव्याने कळावं

कधीतरी वाटतं आजारी पडावं
स्वतःला काय झालंय हे नव्याने कळावं..

-चैतन्य रासकर

नभाला नभांची मिळे सावली

Submitted by द्वैत on 10 May, 2024 - 01:04

दिशा धावती दूर क्षितिजापुढे या
दिठीची मिती आज रुंदावली
नभाला नभांची मिळे सावली

दिसू लागता गाव कोठे सुखाचा
मुक्या पैंजणी धून झंकारली
नभाला नभांची मिळे सावली

फुलावे कळीने पहाटे पहाटे
तशी आर्तता अंतरी दाटली
नभाला नभांची मिळे सावली

कुणी छेडता मारवा सांजवेळी
शिडे गलबतांची हलू लागली
नभाला नभांची मिळे सावली

द्वैत

सेवानिवृत्तीची क्षणचित्रे

Submitted by पॅडी on 9 May, 2024 - 01:41

*सेवानिवृत्तीची क्षणचित्रे*

१/ समारोप

सुरकुतल्या शुभेच्छांचा गंधवर्षाव
कोमेजल्या अभिनंदनाचे हार तुरे
इतिहासजमा कालखंडावर
पहिले अन् शेवटचे गौरवपर भाषण,
सर केलेल्या अत्युच्च शिखरावरून
पेशवाई कटागत; सामूहिकरित्या-
अनाम अंधारदरीत ढकलून दिल्यासारखा
तो आत्मक्लेशी सुवर्णक्षण !

२/ दिनचर्या

रस्ता चुकलाच कसा?

Submitted by चंद्रहास शास्त्री on 6 May, 2024 - 12:17

रस्ता चुकलाच कसा?
©️ चन्द्रहास शास्त्री

आज काफिला आला, इथे कळ्यांचा कसा
माझे मलाच उमजेना, रस्ता चुकलाच कसा?

दवांचे लेऊन ते, वसन मनोहर भारी
डोलत डोलत आल्या, रस्ता चुकलाच कसा?

की नवा शिरस्ता हा, धरला ते समजेना
कळ्यांनो सांगा ना, रस्ता चुकलाच कसा?

तिला थांबू द्या जरा, तुम्ही जा सुखे घरां
पण तरी सांगून जा, रस्ता चुकलाच कसा?

सिद्ध मी हा स्वागतां, तरी विद्ध होई ती
म्हणून मी विचारतो, रस्ता चुकलाच कसा?

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन