फांदीचे घरटे झाले.
©️ चन्द्रहास शास्त्री
येताच फांदीवरी तू, फांदीचे घरटे झाले
हवे तसे सारे झाले, स्वप्नातले घर ते झाले.
तुटल्या त्या पानाला, देठ ते पुन्हा जुळाले
अधांतरी जे राहीले , ते प्रतिष्ठित असे झाले.
बाणा आपुला करारी, रण जिंकले मग निमाले
फिनिक्सची उंच भरारी, घेण्यास मन सज्ज झाले.
पारिजाताचे सकाळी, निज आख्यान मज कळाले
खुडले खोड कुणी ज्याचे, झाड तेच सजीव झाले.
गर्भगृहामधल्या
टिमटिम प्रकाशात
टकमका पाहतो तुला…
तू मला पाहतोस की नाही
याबद्दल असू शकते दुमत
सतराशेसाठ विवंचना
जगण्याचे घोर
कायबाय शिजत असते
सतत अव्याहत
सडक्या टाळक्यात
चालूच असेन
टकळी तुझीही अखंड
पण खात्री करायची नसते सोय
क्वचित भीती
फुटायचे श्रद्धेला फाटे
ठेवता थोडी फट
बोलाबसायची सोय
तर पिटतो चकाटया
काढतो उणेदुणे
उखाळ्यापाखाळ्या,
प्रत्यक्षात तुझ्यामाझ्यात
नितांत सुंदर पोकळी
गहनगूढ मौनाच्या
भिरभिरत्या पाकोळ्या
निघालीच आहेस डावलून तर,
एकदा वळून पाहशील का,
कोपऱ्यात या काळजाच्या,
दरवळ बनून राहशील का?
अडखळणाऱ्या या शब्दांना,
थोटका आधार देशील का,
हजार यातना त्यांच्या,
पण,थोड्या ऐकून घेशील का?
भरकटलेल्या या कश्तीला,
दिशा एखादी देशील का,
मूठभर वेदना माझ्या,
आठवण म्हणून नेशील का?
अबोला धरून तरी,
दबक्या पावलांनी येशील का?
रक्ताळलेल्या या जखमांवर,
फुंकर मारून जाशील का?
माळून चेहऱ्यावर हसू पुन्हा,
हट्ट आता सोडशील का?
जागं करून मला पुन्हा,
हे स्वप्न माझं मोडशील का..?
सखे, तू
- चंद्रहास शास्त्री
मात्रा = १७
मी कुठे मागतो सर्वकाही, द्यायचे तेवढे दे सखे तू
मी कुठे देतसे सर्वकाही, घ्यायचे तेवढे घे सखे तू.
मी कुठे सांगतो सर्वकाही, तू कुठे ऐकते सर्वकाही
मी कुठे म्हणतो तुला जराही, ऐकायचे ते ऐक सखे तू.
तकरार नाही इकरार हवा, आपलासा एक मितवा हवा
प्रेमाचा असा चांदवा हवा, रहायचे तसे रहा सखे तू
इतकेच ओळखीचे
© चन्द्रहास शास्त्री
इतकेच ओळखीचे, आपुले नाते असे.
काही सारखे नसे, पण पारखेही नसे
कोणी कसे पहावे, अपुल्या हाती नसे
म्हणावे काय कोणी, अपुल्या ओठी नसे.
हसणेच गुन्हा असे, सवय हीच जात नसे
मूर्खांच्या स्वर्गी या, कधी पारिजात नसे
मोकळ्या आकाशी, ढग हे पाहती कसे
स्वच्छ चांदणे यांना, पाहताच येत नसे
रागवेल निसर्गही, जिभेला हाडच नसे
देवाच्या काठीला, म्हणे आवाजच नसे
खबरबात नाही.
© चन्द्रहास शास्त्री
क्षण असा एकही जात नाही
की, तुझी आठवण येत नाही
माझी कविता मी गात नाही
मोगऱ्याची बरसात नाही.
सूचतात काही काव्यपंक्ती
सांजवेळ टळून जात नाही
कितीदा फुलती वनात चैती
पण चांदण्यांची रात नाही.
गायिले पंचमाचे सूर जे
ते तर आता ओठांत नाही.
लय ती गेली आभाळी कुठे
मला दिसतही मेघात नाही.
मी पहाटे गेलो उद्यानी
पण तिथे तो पारिजात नाही
तिथल्या त्या बहरल्या लतांनी
दिली काही खबरबात नाही.
गीत नवे
©️ चन्द्रहास शास्त्री
शब्द वेगळे अर्थ वेगळे, सखे, बोलणे निमित्त असते,
कुणां कळते बोललेले ते, ऐकले ते बोलले नसते
लोकांस चंद्र दाखवूनही, कमळ मात्र फुललेले असते
काय करावे लोकांचे या, त्यांना काही कळतच नसते.
आपण दोघे मोहरलेले, आठवणींची सोबत असते
हृदयाच्या या राज्यात सखे, आपल्या विना कुणी नसते.
पहारे असू देत कितीही, त्यांची तमा कोण का करते
बरसणाऱ्या साऱ्या सरींना, तसे जगणे ठाऊक असते.
बदललेली ती..
बुटकी ती.. काळी ती..
कुरूप ती.. नकोशी ती..
परित्यक्ता ती.. विधवा ती..
असायचीच अशी एखादी ती..
भरलेल्या प्रत्येक कुटुंबात..|
कान्हा उदार आहे.
चंद्रहास शास्त्री
ऊन पाऊस वारा, ऋतु मजेदार आहे
बंद हे दार आहे, कान्हा उदार आहे.
चित्त हेच गाभारा, रोज माझे मागणे
मन हे मंदिर आहे, कान्हा उदार आहे.
घेतले फार काही, नाकारले नाही
जीवन उधार आहे, कान्हा उदार आहे.
तेही दिले तयाने, न होते प्राक्तनी जे
तोच दातार आहे, कान्हा उदार आहे.
मदमोहमत्सराचा, जगी अंधार आहे
मला आधार आहे, कान्हा उदार आहे.
तू येशील तेव्हा
काजळी धरलेल्या
मिणमिणत्या नंदादीपाची
पिवळसर ज्योत
भडकेल क्षणभर
विझेल अकस्मात
अन्
जळक्या वातीचा उग्र दर्प
भरून राहील चराचरात...
कोपरे धरून असलेले
सुजलेले डोळे
पेंगणारे चेहरे, सोडतील
सुटकेचा दीर्घ नि:श्वास
लगेचच चालवू लागतील
पुढच्या ‘ क्रिया - कर्माचे ’
व्यावहारिक व्याकरण...