* उत्खनन *
थांग मनाचा लागेना
लाख ढवळला तळ
आटलेल्या असोशीला
ऐसे विश्वव्यापी बळ
वठलेल्या वासनांना
पुन्हा नव्याने धुमारे
पुन्हा पान्हावले शब्द
पुन्हा नवेच शहारे..!
मन पाखरू बेफाम
उडे आपुल्या तालात
द्वाड वारा शीळ घाली
ऋतु हासती गालात
संथ वाहत्या धारेला
यावे उगमाचे भान
तशी जागवली कुणी
युगायुगाची तहान ?
पाळामुळाशी भिडता
गेलो चिणून-शिणून
मिळे अक्षरांचे धन
देहा-मनाला खोदून...
***
गर्भगृहामधल्या
टिमटिम प्रकाशात
टकमका पाहतो तुला…
तू मला पाहतोस की नाही
याबद्दल असू शकते दुमत
सतराशेसाठ विवंचना
जगण्याचे घोर
कायबाय शिजत असते
सतत अव्याहत
सडक्या टाळक्यात
चालूच असेन
टकळी तुझीही अखंड
पण खात्री करायची नसते सोय
क्वचित भीती
फुटायचे श्रद्धेला फाटे
ठेवता थोडी फट
बोलाबसायची सोय
तर पिटतो चकाटया
काढतो उणेदुणे
उखाळ्यापाखाळ्या,
प्रत्यक्षात तुझ्यामाझ्यात
नितांत सुंदर पोकळी
गहनगूढ मौनाच्या
भिरभिरत्या पाकोळ्या
तू येशील तेव्हा
काजळी धरलेल्या
मिणमिणत्या नंदादीपाची
पिवळसर ज्योत
भडकेल क्षणभर
विझेल अकस्मात
अन्
जळक्या वातीचा उग्र दर्प
भरून राहील चराचरात...
कोपरे धरून असलेले
सुजलेले डोळे
पेंगणारे चेहरे, सोडतील
सुटकेचा दीर्घ नि:श्वास
लगेचच चालवू लागतील
पुढच्या ‘ क्रिया - कर्माचे ’
व्यावहारिक व्याकरण...
घराघरातून चिवचिवणाऱ्या
प्रत्येक शहाण्या मुलाला
आखीवरेखीव चाकोरीत ढकलून
बोन्सायगत वाढवण्यालाच
आपण संस्कारा-बिंस्काराचे
बिरूद चिकटवून देतो,
अवास्तव अपेक्षांचे वेताळओझे
कोवळ्या खांद्यांवर लादून
समजुतीच्या (त्याच त्या!) गोष्टी सांगत
त्यांना जन्मभर हाकारत जातो
आई म्हणते:
शहाणा मुलगा नेहमी
स्वत:च्या हाताने जेवतो
टाकत नाही उष्टेबिष्टे
करत नाही पसारा घरभर,
- आम्हाला असते एवढे स्वातंत्र्य
सुख सुविधा तर
आज कुठच्या कुठे असतो!
करवादल्या बाबांची टकळी
चालूच असते दिवसभर
आलीच आहेस भेटीला तर
आरामात; नीट टेकून बस
टणकाय दोघांमधील माती
तरी टिकवून आहे कस ...
मोकळी ढाकळी देहबोली
शब्दांना अंगांग सैलावू दे
खळाळत्या शुभ्र हास्याला
थोडे पात्राबाहेर फैलावू दे...
रुचेल न रुचेल; भीतीपोटी
दाबू नकोच आतले कढ
उधळ बंधार्यांचे मनसुबे
जरा हमसून हमसून रड...
कशाला उगाच त्रास म्हणून
नाकारू नकोस वाफाळता चहा
मनावरचे मळभ दूर सारून
एकदा माझ्या आरपार पहा...
सावध; सजग जगण्याचा दंभ
क्षणभरासाठी सोडून देऊ
हातात हात घेऊन ; परत -
टिपूर चांदण्यात फिरून येऊ...
***
आजची कविता भुजंगप्रयाग ह्या मध्ये लिहण्याचा प्रयत्न केलाय... बघा! जमलंय का आणि काही त्रुटी आढल्यास सांगायला विसरू नका.
एकांतात माझ्यासवे चंद्र जागा
नक्षत्रे असे सोबतीला तयाच्या
उदासी नभांची जमा होत गर्दी
उरावा जसा मंद अंती उसासा
दुरावा मनाचा अता खोल झाला
तुलाही मलाही दुभंगून गेला
कधी भेट होई? अता कोण जाणे
उरावी तरी ही जराशी अपेक्षा
- अक्षय समेळ
हेरुनि वर्म सारे, का घाव झाले नेमके
आसवांविना दु:ख ते अजून झाले पोरके
ताणल्या स्मितातुनी, हास्य सारी खुणावती
चंद्रास ग्रासण्या छाया का पुढे सरसावती
भव्य प्रासादातुनी, सुखे सारी बोलावती
बंधण्या विहंग पिंजरी पाश का सरसावती
जरतारी वस्त्रांतुनी, सौख्य कशी वेडावती
सांधण्या जखमा उरिच्या शेले थिटे का पडती
भव्य सारी जीवने अन् भव्य सारे सोहळे
शाप अभावाचा का शून्याच्याच भाळी पडे
’राहत’ शल्यात लघुत्वाच्या विश्व देवकणी वसे
कालपटाचे सहप्रवासी का रडे का हसे
- राहत
कैफ़ियत बिनधास्त झाली
- in the pleasurable presence of किमयागार _/\_
सूर तुझा कसा?
मोरपंखी स्पर्श जसा,
वाऱ्यावरील अलवार झोका,
पाव्यातला नाद जसा,
कि उमललेला सोनचाफा?
सूर तुझा कसा?
ओला पहिला मृदगंध जसा,
मंद धुंद निशिगंध जसा,
फुलातला मकरंद जसा,
कि अळुपर्णावरील मोती जसा ?
खरंच..
मला गवसला जो,
तो तुझा सूर कसा?
सागराची गाज तसा?
शांत पुनवेचं चांदणं तसा?
सांजवेळीची कातर हुरहुर तसा?
कि निसर्गाचा राग नवा?
मला गवसलेला तव सूर असा,
माझ्या स्वरात मिसळावा तसा!
अगदीच तसा!!
---------------------------------
तो आहे निळ्या रंगासारखा,
आणि लाल माझा रंग..
माझी चाल थोडी वेगळी,
आणि त्याचा फारच वेगळा ढंग..
पण काहीतरी आहे त्यात,
दुसर्यांपेक्षा फार वेगळं..
त्याच्या निळ्या रंगांच्या धाग्यांनी,
माझं अंतरंग व्यापलय सगळं..
त्याला कदाचित माहितीही नसेल,
माझ्या लाल धाग्याचं जग..
एकाच प्रश्न सतावतोय फक्त,
त्याने हे लाल धागे पहिलेच नसले मग..
लाल माझ्या पडद्यावरती,
निळी नक्षी बहरतेय..
पण त्याचे निळे पडदे मात्र,
अजूनही निळेशारच दिसतायत...