नखशिकांत भिजतात पावसात वेदनांच्या
गुंफतात भाव-भावना मैफिलीत शब्दांच्या
एकांतात कुठे कुरवाळतात कवी दुःखाना
जाहीर प्रदर्शन मांडतात सभेत प्रेक्षकांच्या
वेळ त्यांचा संपूर्णपणे समर्पित एकांताच्या
चित्त त्यांचे सदा अधीन इंद्रधनू कल्पनेच्या
लेखणी वेगवान पळते पवनापरी जेधवा
मन घाली प्रदक्षिणा भ्रमरापरी वसुंधरेच्या
यत्न करुनी थकल्या मेनका नानापरीच्या
तरी न भंगते विश्वमित्रापरी कवींची तपस्या
निश्चल असते ध्येयाप्रती त्यांची मानसिकता
काय करणार तिथे अप्सरा स्वर्गलोकाच्या
© अक्षय समेळ
अकांशाचा भुंगा पोखरी मनास
नश्वर असे सर्वकाही आठवी मनास
परी चालताना मार्गावरून सत्याच्या
खेचेल गोडी ऐहिक सुखाची मनास
वासना उठाठेव करिती मनास
उरेल का सत्य चिंता जाळसी मनास
मनाचेच हाल होती मनाच्याच हातून
दुसरा कोण विरोध करिसी मनास
अस्मितेचा मृत्यू रडवी मनास
दुःख काय असते जाणवी मनास
"मी" पणा सोडाया मन धाजावत नसे
तेव्हा मिथ्या अहंकार फासी देई मनास
काय काय करावे, संभ्रम आडवी मनास
गृहीत धरले सारे, चूक आकळी मनास
नश्वर वस्तूंचा मोहापाश सुटणार नाही
सत्य जाणून गल्यानी मारे मिठी मनास
- अक्षय समेळ
जे जे तुला बोलायचे राहून गेले होते
ते ते कागदावर आपसूक मांडले गेले
एक एक शब्द अश्रूंनी भिजला होता
विरहाच्या अग्नीत कागद ही जळाला
राख होऊन कागदाची विभूती झाली
अनेकांच्या भाळी श्रद्धापूर्वक सजली
भक्तगणांची आता ना भासते उणीव
तरी मनात उरते तुझी अक्षय जाणीव
- अक्षय समेळ
आजची कविता भुजंगप्रयाग ह्या मध्ये लिहण्याचा प्रयत्न केलाय... बघा! जमलंय का आणि काही त्रुटी आढल्यास सांगायला विसरू नका.
एकांतात माझ्यासवे चंद्र जागा
नक्षत्रे असे सोबतीला तयाच्या
उदासी नभांची जमा होत गर्दी
उरावा जसा मंद अंती उसासा
दुरावा मनाचा अता खोल झाला
तुलाही मलाही दुभंगून गेला
कधी भेट होई? अता कोण जाणे
उरावी तरी ही जराशी अपेक्षा
- अक्षय समेळ
जाणिवांचा मृत्यू अन्
पुरता गांजला देह
काल होती तशी नाही
ही मावळणारी सांज
झोळी साऱ्या ह्या ऋतूंची
वाटते आज निकामी
रंग रंग वितळले
काळोखाच्या गर्द दोही
विझते ज्योत क्षणात
वाऱ्याच्या मंद स्पर्शाने
केले असता प्रयत्न
पेटेल पुन्हा नव्याने
जिद्द असेल अंतरी
झुकेल ते आकाशही
दुःखाला मरण नाही
खंत जर बाळगली
- अक्षय समेळ.
हृदयातील भावना जेव्हा उचंबळतात
ओघळते अश्रू तेव्हा सहज मिसळतात
काय माहिती काय जादू असते?
फेसाळणाऱ्या त्या सोमरसाच्या ग्लासात
काहींसाठी ते टाकाऊ अन् नकोसे गटार असते
काहींसाठी ते हवेहवेसे स्वर्गाचे द्वार असते
व्यक्ती तितक्या वल्ली... पु लं चे अगदी खरे!
चांगले किंवा वाईट असे खरेच काही असते?
घटना घडतात आणि त्या घडणारच
त्यांचा अर्थ लावणारा हरवतो विचारातच
कित्येक पेले सोमरसाचे खाली होतात
मोजण्याच्या आत माणूस ढगात
सोडूनी चिंता उद्याची सारी
बाळ होऊनी पुन्हा जन्मावे
अन् पदराच्या अभायाखाली
डोळे घट्ट मिटून पुन्हा निजावे
वाटता भीती जराशी अंधाराची
ओढुन घ्यावी रजाई जरतारीची
अन् धडधड तुझ्या हृदयाची
ऐकत गुपचूप पडून रहावे
घरभर बागडावे इवल्या पावलांनी
मनसोक्त हसावे खोड्या करुनी
अन् मिळता ओरड जरासा
तुझ्या पाठीमागे हळूच लपावे
- अक्षय समेळ.
"आरू! तुझे काम थांबव आता आणि चल, नाहीतर आपल्याला वेळेत पोहचता येणार नाही." संयुक्ता आरवची बालमैत्रिण आणि पत्नी आधिकार वाणीने आरावला म्हणाली.
"हो, अगं एवढे संपले की निघू आपण. थांब जरा!" आरव आगतिकिने संयुक्ताला म्हणाला.
"ठीक आहे! तू कर तुझे काम; मी निघते." संयुक्ता थोड्या लटक्या रागाने उत्तरली.
"बरं! चल निघू आपण!" आरव खुर्चीतून उठून आपले जॅकेट, लॅपटॉप सोबत घेत नाराजीच्या सुरात म्हणाला.
आरव आणि संयुक्ता दोघे ऑफिसच्या बाहेर उभ्या असलेल्या काळया मर्सिडिज गाडीमध्ये बसले आणि संयुक्ताने ड्रायवरला गाडी मंत्रा रिसॉर्टकडे घेण्यासाठी सांगितले.
शोधितो आहे मिळाला अजून नाही
तुझ्या आठवणींना पर्याय असा काही
गुंफून शब्दांची माळ काव्य केले किती
मंत्रमुग्ध असे लिहणे काही जमले नाही
तुझ्या सुखात नेहमी माझे सुख मानले
समाधान मात्र तुझ्याकडे उधार राहिले
काही दिवस देवदास सारखे जगून पाहिले
मद्याचा सहवास करणे मात्र जमले नाही
अपेक्षा होती मला भरघोस परताव्याची
हृदयाची गुंतवणूक मात्र चुकीची निघाली
नफा ना तोटा ह्या तत्वावर संधी तर झाली
केलेल्या संधीचे सोने करणे मात्र जमले नाही
- अक्षय समेळ.
उत्साह अमृततुल्य आज नेहमीप्रमाणेच गजबजलेले होते. चहाचे कप इथून तिथे नाचत होते, पोहे आणि उप्पित चा वास परिसरात घमघमट होता.
अनिरुद्ध आपल्या चहाचा आस्वाद घेत असताना त्याचे लक्ष एका चिमुरडी कडे गेले. ती सर्वांकडे आशाळभूत नजरेने पाहात होती; कोणीतरी आपल्याला काही मदत करेल असा आर्विभाव तिच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होता. कर्दमलेले केस, मळकट चेहरा, व फाटलेले कपडे पाहून अनिरुद्धला तिची दया आली. शेवटी अनिरुद्ध ने तिला जवळ बोलावले.
"तुला भूक लागली आहे का? काही खायला हवे का?" अनिरुद्ध ने त्या चिमुरडीला विचारले. त्यावर तिने नुसतीच होकारार्थी मान हलवली.