कोण गाढ झोपलाय
आणि कोण घेतोय सोंग
सर्वांनाच राग येतोय
हे कसल आलय ढोंग
मी कायच करू शकतो
हेच आधी सांगा कुणी
नसेल जमत काहीच मग
काढू नका माझी उनी
मी आहे साधा आणि
मला कळतो माझा रंग
सर्वांनाच राग येतोय. . . .
सगळं आहे हातात, तरी
रडण्याची घाई घाई
कळतं पण वळेल कसं
सांगा आत्या मावशा आई
छोटंसच स्वप्न माझं
रोजच होतंय भंग
सर्वांनाच राग येतोय. . . .
आला पाऊस पाऊस
आल्या वळिवाच्या सरी
चल धावू वेगे वेगे
जाऊ भिजतच पोरी
नको पायात चपला
अनवाणी जाऊ पुढे
छप छप वाजे पाणी
नभी वाजती चौघडे
नको भीती आज काही
आज भिजूनिया घेऊ
नको विचार कशाचा
आज पावसात न्हाऊ
- डॉ. रोहिणी चंद्रात्रे वाघमारे
शुष्क ओठांत पेरलेस शब्द
ओल्या शब्दांवर ठेवलेस ओठ
ठीक तिथूनच सुरू झालीये
माझ्या कवितेची चिमणी गोष्ट..
नाका-तोंडात शिरले पाणी
वाटले बुडलो; आधार भेटला
पहिली वीज तिथे कडाडली
मिणमिणता एक दिवा पेटला
भरती ओहोटी फितूरले ऋतू
नाठाळ वाऱ्याने फेरली पाठ
चार दोन थेंबातच चिंबावलो
भरभरून पावलो काठोकाठ
सुरकुत्यांमधून सरली वर्ष
पापण्यांवर पेलले आभाळ
तळहातावर झेलले इंगोळ
श्रीहरी कधी झालो शिशूपाळ
* दुभंग *
किलकिले करोनी I जरा बंद दार
प्रवेशलो पार I मुळापाशी II
तिथे उजवेना I आसक्तीची कूस
माती भुसभुस I लाख होती II
कोमेजून कोंभ I पहुडला संथ
वाटेनाच खंत I त्याची त्याला II
ओलाव्याचा सोस I मनाला उभारी
गोठलेली सारी I इच्छाकांक्षा II
घेववेना तिन्ही I ऋतुशी धडका
जन्माचा भडका I थंडावला II
पाने फुले फळे I कुठले बहर
स्वप्नात प्रहर I टक्क जागे II
तळे शेवाळले I साकळे अंधार
वेदना गर्भार I मुळापाशी II
***
गुलाबी*
सुर निखळले नाद गुलाबी
नकोस घालू साद गुलाबी...
शपथा वचने गुंतत जाणे
कुरतडतो उन्माद गुलाबी...
घाव रेशमी जपले; फसलो
छळती जखमा…वाद गुलाबी...
फुलोर गळला उन्मळलो मी-
कसला मग संवाद गुलाबी...
क्षतविक्षत मी भिंगुळवाणा
पांघरतो तुझी याद गुलाबी...
द्वाड आठवाची वसंत बाधा
मानगुटीवर ब्याद गुलाबी...
मैफलीत बहु रडलो आणिक-
पडल्या टाळ्या दाद गुलाबी..!
***
(* गझल सदृश्य कविता)
* उत्खनन *
थांग मनाचा लागेना
लाख ढवळला तळ
आटलेल्या असोशीला
ऐसे विश्वव्यापी बळ
वठलेल्या वासनांना
पुन्हा नव्याने धुमारे
पुन्हा पान्हावले शब्द
पुन्हा नवेच शहारे..!
मन पाखरू बेफाम
उडे आपुल्या तालात
द्वाड वारा शीळ घाली
ऋतु हासती गालात
संथ वाहत्या धारेला
यावे उगमाचे भान
तशी जागवली कुणी
युगायुगाची तहान ?
पाळामुळाशी भिडता
गेलो चिणून-शिणून
मिळे अक्षरांचे धन
देहा-मनाला खोदून...
***
* निरोपाच्या कविता *
एक.
मान वेळावण्याआधी
प्राण कंठाशी येतात
न खाल्लेली सुपारी लागते
उंबर्यात पाऊल अडते,
ताटातुटीच्या बिकट समयी
नको नको म्हणताना
तेच ते आदिम आर्त नाट्य
आधुनिक युगातही घडते
दोन.
प्रकृतीस जपा
जेवणाचे हाल, रात्रीची जाग्रणे नको
पोहोचताच फोन करा
तुझ्या लक्षवेधी सूचनांची
लांबलचक यादी,
माझे बर्फाच्या तुकड्यागत
स्वत:त विरघळत जाणे
तुझ्या हरणकाळज्या पात्रात
धोक्याच्या पातळीपर्यंत
येऊन ठेपलेली महानदी
तीन.
गर्भगृहामधल्या
टिमटिम प्रकाशात
टकमका पाहतो तुला…
तू मला पाहतोस की नाही
याबद्दल असू शकते दुमत
सतराशेसाठ विवंचना
जगण्याचे घोर
कायबाय शिजत असते
सतत अव्याहत
सडक्या टाळक्यात
चालूच असेन
टकळी तुझीही अखंड
पण खात्री करायची नसते सोय
क्वचित भीती
फुटायचे श्रद्धेला फाटे
ठेवता थोडी फट
बोलाबसायची सोय
तर पिटतो चकाटया
काढतो उणेदुणे
उखाळ्यापाखाळ्या,
प्रत्यक्षात तुझ्यामाझ्यात
नितांत सुंदर पोकळी
गहनगूढ मौनाच्या
भिरभिरत्या पाकोळ्या
तू येशील तेव्हा
काजळी धरलेल्या
मिणमिणत्या नंदादीपाची
पिवळसर ज्योत
भडकेल क्षणभर
विझेल अकस्मात
अन्
जळक्या वातीचा उग्र दर्प
भरून राहील चराचरात...
कोपरे धरून असलेले
सुजलेले डोळे
पेंगणारे चेहरे, सोडतील
सुटकेचा दीर्घ नि:श्वास
लगेचच चालवू लागतील
पुढच्या ‘ क्रिया - कर्माचे ’
व्यावहारिक व्याकरण...
घराघरातून चिवचिवणाऱ्या
प्रत्येक शहाण्या मुलाला
आखीवरेखीव चाकोरीत ढकलून
बोन्सायगत वाढवण्यालाच
आपण संस्कारा-बिंस्काराचे
बिरूद चिकटवून देतो,
अवास्तव अपेक्षांचे वेताळओझे
कोवळ्या खांद्यांवर लादून
समजुतीच्या (त्याच त्या!) गोष्टी सांगत
त्यांना जन्मभर हाकारत जातो
आई म्हणते:
शहाणा मुलगा नेहमी
स्वत:च्या हाताने जेवतो
टाकत नाही उष्टेबिष्टे
करत नाही पसारा घरभर,
- आम्हाला असते एवढे स्वातंत्र्य
सुख सुविधा तर
आज कुठच्या कुठे असतो!
करवादल्या बाबांची टकळी
चालूच असते दिवसभर