कविता

ठेवा

Submitted by पॅडी on 15 April, 2024 - 00:07

सोनसळी अक्षरांचा
उदे लोचनात शेला
सांग कुणासाठी असा
जीव वेडापिसा झाला..?

जीव वेडापिसा झाला
नाही चित्त थाऱ्यावर
गोड पैंजणांची साद
छुम छुम वाऱ्यावर

छुम छुम वाऱ्यावर
मन पाखरू ओलेते
वाट पाहुनी थकली
रात्र डोळ्यांना डसते

रात्र डोळ्यांना डसते
शब्द चिंब ओले रान
थोडा उफानला वारा
थोडे किरमिजी क्षण

थोडे किरमिजी क्षण
उर्मी अनावर झाल्या
ठेव जतन करून
गोष्टी तुझ्या-माझ्यातल्या..!
***

कवितेच्या ठिपक्यांमधून...

Submitted by पॅडी on 12 April, 2024 - 01:21

कवितेच्या पांढऱ्याशुभ्र ठिपक्यांमधून
व्यक्त होणारी माझी भाविकता
पुरेशी नसते म्हणून की काय
तू नित्तनेमाने ढकलतेस माझा निगरगठ्ठ देह
कुठकुठल्याशा जागृत देवस्थानाच्या दिशेने…

मला भिववत-चिथावत नाही पाप
लोभवत-खुणावत नाही पुण्य
तरी चालतो निमूट –
नुकत्याच खरेदी केलेल्या
गुराच्या गळ्यातल्या फुटक्या घुंगरासारखा
आवाजवीहीन – तुझ्या पाठोपाठ

शब्दखुणा: 

आलीच आहेस तर...

Submitted by पॅडी on 5 April, 2024 - 01:03

आलीच आहेस भेटीला तर
आरामात; नीट टेकून बस
टणकाय दोघांमधील माती
तरी टिकवून आहे कस ...

मोकळी ढाकळी देहबोली
शब्दांना अंगांग सैलावू दे
खळाळत्या शुभ्र हास्याला
थोडे पात्राबाहेर फैलावू दे...

रुचेल न रुचेल; भीतीपोटी
दाबू नकोच आतले कढ
उधळ बंधार्‍यांचे मनसुबे
जरा हमसून हमसून रड...

कशाला उगाच त्रास म्हणून
नाकारू नकोस वाफाळता चहा
मनावरचे मळभ दूर सारून
एकदा माझ्या आरपार पहा...

सावध; सजग जगण्याचा दंभ
क्षणभरासाठी सोडून देऊ
हातात हात घेऊन ; परत -
टिपूर चांदण्यात फिरून येऊ...

***

शब्दखुणा: 

मायबोलीकर यूट्युबर्स - Swaroop Kulkarni Poetry (स्वरुप)

Submitted by स्वरुप on 4 April, 2024 - 09:59
स्वरचित कवितांचे वाचन

कविता मी तसा शाळा कॉलेजच्या दिवसांपासून लिहतोय. त्या त्या वेळी शाळा कॉलेजच्या नियतकालिकांतून वगैरे छापूनही आल्या पण त्यापलीकडे जाऊन त्याचे काही करावे किंवा कुठे सादर कराव्यात वगैरे फारसा अट्टहास नव्हता. कालांतराने मायबोलीवर आलो. गुलमोहरावर, झुळकेवर रमलो. इथे दर्जेदार लिहणाऱ्यांकडून त्या काळात दादही मिळत गेली आणि कविता लिहित राहिलो.
मध्ये बरीच वर्षे कामामुळे आणि इतर प्रायोरिटीजमुळे कवितालेखन खुप कमी झाले..... जवळजवळ नाहीच!!
चांगले चांगले वाचत होतो; youtube, podcasts वगैरेच्या माध्यमातून खुप चांगले ऐकत होतो.... पण बसून परत कविता लिहिणे वगैरे होत नव्हते.

शब्दफुलांची बाग

Submitted by Meghvalli on 22 March, 2024 - 00:26

शब्दफुलांच्या सुंदर बागेतुन मी शब्द वेचून आणतो।
शब्दांचा एक गुछ गुंफून मी कविता सादर करतो।।

शब्द हे निर्जिव कसे जिवंत होऊन बागडतात जणु ससे।
हृदयाचा ठाव घेऊनी कुठे दडून हे बसतात आणि कसे।।

कधी कधी तिखट शब्द बोचरे होऊन टोचतात जणू काटे।
घालून घाव हृदयावर वाहतात अश्रु होऊन डोळ्यां वाटे।।

शब्द अनोखे नी दुर्मिळ ओवुन बनविले मी अनेक अलंकार।
त्या अलंकारां नी तिज मडवताच तीच्या सौंदर्यास नूरला पार।।

विविध रंगाच्या विविध ढंगांच्या विविध छंदांच्या कविता।
वैविध्याने नटलेले शब्द चित्र बहरले कागदावर लिहिता।।

देवदर्शनाच्या निमित्ताने...

Submitted by पॅडी on 21 March, 2024 - 04:33

स्वत:पासून दू ऽऽ र पळून जाण्याचा
फसावा दुबळा प्रयत्न
अन् अडकून पडावे आयुष्यभर
घाटमाथा; आडवळणी दऱ्याखोऱ्यात
तसा तुझा सर्वव्यापी वावर
सरंजामशाही तोऱ्यात

औसे-पुनवेला येतो तुझ्या भेटीला
हिंदकळत... डुचमळत...
अनवट वळणे; खाचखळगे तुडवत

म्हणशील तर हवापालट
चेंज ऑफ टेस्ट
पूर्वजन्माची कार्मिक लेणदेण,
नसते कशाचीच खात्री -
पण पडलेच पदरात पुण्यबिण्य
तर नॉट अ बॅड बार्गेन..!

शाळा

Submitted by पॅडी on 6 March, 2024 - 02:38

विकल मनाच्या पडवीमध्ये
घण घण घंटा; भरते शाळा
वर्ग तासिका हस्त पुस्तिका
थकवी मास्तर खडू फळा

उंचाविती हात षडरिपू
त्यांना पडती प्रश्न गहन
मागील बाकावर पेंगुळते
रोज भाबडे द्रष्टे मन

रसाळ मोठे विषय विभ्रमी
गृहपाठाची कसरत पुरती
आखीव-रेखीव अक्षर ओळी
डाग शाईचे आत्म्यावरती

घोकून पाढे; प्रश्न उत्तरे
का टक्क्यांचा चुकतो होरा
वाचाळांना वेळ पुरेना
अन् मौनाचा पेपर कोरा..!

***

शब्दखुणा: 

सरते वर्ष

Submitted by अनुजय on 31 December, 2023 - 10:08

सरते वर्ष

बघता बघता एक वर्ष सरल
हळूच तेवढं जगणं काढून घेतल ….

नियती मोठी असते चलाख
काढून घेते कित्येकांचा घास
मापा मधले कपात कधी आले
कुणालाच कधी ना कळलं….

कुणाचे मायबाप गेले
कुणाचे काका मामा संपले
भाव विश्र्वामधले ऋणानुबध
कळले नाही कसे पोकळ बनल.,..

समाज जीवनाचा तोच तरंग
जाती धर्माच्या भट्टीत नाही भंग
तू तू मी मी करत चिखल फेकीने
फेकुंनी कसे सर्वांना मामा बनवलं….

विषय: 
प्रांत/गाव: 

सागरओढ *

Submitted by अवल on 30 December, 2023 - 21:42

(* Sea Fever : BY JOHN MASEFIELD या कवितेचा स्वैर अनुवाद)

IMG_20231231_081503.jpg(लेकाने काढलेला फोटो)

आज गेलंच पाहिजे, खोल खोल एकांत समुद्रात आभाळासोबत,
संगतीला हवीय उंच शिडाची होडी अन तिलाच न्याहाळणारा एक तारा;
सुकाणूचा ताबा अन वाऱ्याच्या शिळेवर फडफडणारे शुभ्र पांढरे शीड,
सागरावरच्या गूढ गडद धुक्याला कापत जाणारा संधीप्रकाश.

कविता

Submitted by मीन्वा on 15 August, 2023 - 02:25

कधी कविता भारंभार बोलतात
शब्दाला शब्द जोडतात
यमकांचे छंदांचे वृत्तांचे
अलंकार घालून सजतात
कधी एखाद्या नदीसारख्या,
ओसंडून वाहतात
कधी खळखळत, तर कधी संथपणे
कधी कधी कविता फुटतात
एखाद्या तुडुंब भरलेल्या धरणाचा
बांध फुटावा तशा
वेगात चिरत जातात कडे कपारी
आणि दगडालाही बोथट बनवतात
कधी कविता मोजकेच बोलतात
हिऱ्या मोत्यांसारखे शब्द गुंफतात
ऐकणाऱ्याच्या काळजाचा ठाव घेतात
काही कविता मात्र... शब्दहीन
एक अक्षरही न बोलता
आपल्या आसपास वावरतात
मौनाची भाषांतरे कळणाऱ्या माणसांच्या

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कविता