कविता
कधी कविता भारंभार बोलतात
शब्दाला शब्द जोडतात
यमकांचे छंदांचे वृत्तांचे
अलंकार घालून सजतात
कधी एखाद्या नदीसारख्या,
ओसंडून वाहतात
कधी खळखळत, तर कधी संथपणे
कधी कधी कविता फुटतात
एखाद्या तुडुंब भरलेल्या धरणाचा
बांध फुटावा तशा
वेगात चिरत जातात कडे कपारी
आणि दगडालाही बोथट बनवतात
कधी कविता मोजकेच बोलतात
हिऱ्या मोत्यांसारखे शब्द गुंफतात
ऐकणाऱ्याच्या काळजाचा ठाव घेतात
काही कविता मात्र... शब्दहीन
एक अक्षरही न बोलता
आपल्या आसपास वावरतात
मौनाची भाषांतरे कळणाऱ्या माणसांच्या