एका कवितेने
मला अमौनाची शपथ घातल्यापासून
मी एक वाहता झरा झालोय!
माझ्या उगमाशी असलेले बुद्बुद् शब्द,
त्या उगमापलीकडे असलेल्या
शाश्वताचा अर्थ
थेट संसारसागरापर्यंत
अनेक वाटांनी,
हळूहळू,
पण ठाम पोहोचवतात!
मग सनातन सूर्य
त्या अर्थांचं पांघरूण विणतो
धरा नेमस्त गर्भार होते,
आणि झऱ्याला
अखंड शब्द मिळतात!
आता मी
त्या उगमापलीकडे जायचं म्हणतोय!
फक्त,
बुद्बुदाच्या उठण्या-मिटण्यामधला
क्षण सापडायचा अवकाश!
~ चैतन्य दीक्षित
यमुनेच्या जळावर, दुपारची सूर्यकिरणं पडली आहेत,
त्यांचा प्रकाश कदंबाखाली बसलेल्या शांतमुद्र श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावर पडतोय. जणू सूर्य त्या यमुनेमार्फत आपला नमस्कार पोहोचवतोय...किंबहुना, यमुनेमार्फत तो श्रीकृष्णाकडून तेज घेतोय.
कृष्ण डोळे मिटतो, एक दीर्घ श्वास घेतो... बाजूच्या लतावेली हलकेच शहारून आता हा वंशी हातात घेणार म्हणून जणू उत्सुक होतात. यमुनेच्या पाण्याचा आवाज तानपुरा होतो आणि कृष्ण कित्येक जन्मांतरांच्या स्नेहाला स्मरत, पंचमावरून स्थिर असा षड्ज लावतो!
षड्ज! सहा स्वरांना जन्म देणारा.. आपल्यातून सारं स्वरविश्व
जुन्या भग्न देवालयातील मूर्ती
अजूनी उभी देत आशीर्वचा
लकाके तमातून, ज्योतिर्मयाच्या
प्रकाशात, ताशीव दगडी त्वचा ।
कुणी उंबऱ्याशी थिजे, आत वाके
बघे यक्ष-गंधर्व दारावरी
निनावी परी ओळखीचे असे
गीत स्पंदे जणू काहि त्याच्या उरी.
स्मृतींच्या पटाची फडाडून पाने
खुली काळपोथी तयाच्या पुढे
कधी खोल गर्तेत जाई बुडोनी
कधी वाट तो ओळखीची चढे
जसे स्पष्ट होई पुढे चित्र त्याच्या
समोरी उभी ती स्वतः देवता,
दिसे त्यास तोही, तिला पाहताना
जशीच्या तशी कातळी कोरतां !
गुलमोहर मोहरतो तेव्हा
सखे तुझे हसणे आठवते
उन्हातही मग चंद्र उगवतो
माझे असणे-नसणे नुरते
छोट्या गोष्टींनाही येथे
अस्तित्वाचा प्रश्न बनवतो
खोड जुनी ती नकळत माझ्या
जितेपणीही क्षणिक मोडते.
गुलमोहर मोहरतो तेव्हा...!
दोन समांतर विश्वांमधले
झालो बघ आपण रहिवासी
एक एक केशरी फूल हे
दोघांमध्ये पूल बांधते.
गुलमोहर मोहरतो तेव्हा...!
भेट ठरावी अन् विसरावा
मीच खुणेचा तो गुलमोहर
फक्त उरावा शोध आपला
मनी असेही भलते येते.
गुलमोहर मोहरतो तेव्हा...!
~ चैतन्य दीक्षित
जिथून वाटा भिन्न जाहल्या
त्या वळणावर उभा जुना मी.
खुणावतो अन् 'ये, ये' म्हणतो
अजून पुढच्या दुज्या कुणा मी.
तशी जुनी तूही वळणावर
तुलाच दिसशिल खुणावताना
..
..
असेच घडते, दोघांमधले
अंतर नकळत दुणावताना.
जुनेपणाचे इतके कसले
गहन-गूढ असते आकर्षण?
नवेपणाला जडत्व इतके,
खरेच असले कसे नवेपण?
असीम काळाचे आवर्तन
नव्या-जुन्याची साधाया सम,
आणि तिहाई 'मी-मी-मी'ची
'तू-तू-तू'ची किंवा बेदम ।
~ चैतन्य
आता बोथट झालो आहे
पुरता मी नट झालो आहे !
फिरतो माझ्या मागे मागे
मी मी-लंपट झालो आहे.
मारुन डोळा खरे बोलतो
इतका चावट झालो आहे.
सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात्
थोडा उद्धट झालो आहे
मार्ग तुझा अनुसरला, आता
मीही अनवट झालो आहे
प्रत्येकाच्या मनाजोगता
हसरा शेवट झालो आहे
~चैतन्य दीक्षित
आंच वाढते सृष्टीची
उकळते माझे मन |
त्याला आवरण्यासाठी
वर ठेवतो झाकण |
माझ्या हिरवेपणाचा
रंग देऊन टाकला |
देऊनिया साही रस
झालो सर्वस्वी मोकळा |
उतरती रंग-रस
सारे मनाच्या पक्वान्नी |
आंच वाढता पुनश्च
झाले कोरडे बाजूंनी |
डोळे सृष्टीचे पाहती
वाहतीही धारा काही |
मना मिळे हाबकारा
ओलावते पुन्हा तेही |
झाली पाकसिद्धी अशी
येई दरवळ पक्वान्नी |
माझा नैवेद्य भोगिला
मीच सहस्रमुखांनी |
जरि जन्मांतरिचे नाते ।
आपुली चुकामुक होते ।
तुज कळते अन् मज कळते ।
अंतर अपुले हळहळते ।।
जरि वसती देही एका ।
मारतोच नेमे हाका ।
ऐकू दोघां नच येते ।
प्रतिसाद कुणी नच देते ।।
जरि भेट-बोलणे नाही ।
तरि चिरपरिचितसे काही ।
अंतरात ग्वाही देते ।
आशेला अन् पालवते ।।
जरि ऐल पैल वा तीर ।
मधुनी वाहे मन-नीर ।
क्षणि ते दर्पणसे होते ।
मज माझे दर्शन होते...क्षणभर !
-चैतन्य
हे दार,
त्याच्या मागचं दार,
आणि त्या दाराच्याही मागचं दार...
अशी आत आत असलेली सगळी दारं
एक एक करत बंद करून
मी कालची एक पायरी चढून
'आत्ता'त आलेय!
हुश्श!
"आता ना, मला फक्त पुढचं पहायचंय"
असं म्हणून मागं वळते, तोच...
तिथे तुम्ही हजर,
तुमच्याही 'आत्ता'च्या दारात.
पण तुमचं दार,
त्याच्या मागचं दार,
आणि त्या दाराच्याही मागचं दार मात्र
पारदर्शक काचेचं...!
~ चैतन्य