गुलमोहर मोहरतो तेव्हा

गुलमोहर मोहरतो तेव्हा

Submitted by चैतन्य दीक्षित on 24 May, 2018 - 22:33

गुलमोहर मोहरतो तेव्हा
सखे तुझे हसणे आठवते
उन्हातही मग चंद्र उगवतो
माझे असणे-नसणे नुरते

छोट्या गोष्टींनाही येथे
अस्तित्वाचा प्रश्न बनवतो
खोड जुनी ती नकळत माझ्या
जितेपणीही क्षणिक मोडते.
गुलमोहर मोहरतो तेव्हा...!

दोन समांतर विश्वांमधले
झालो बघ आपण रहिवासी
एक एक केशरी फूल हे
दोघांमध्ये पूल बांधते.
गुलमोहर मोहरतो तेव्हा...!

भेट ठरावी अन् विसरावा
मीच खुणेचा तो गुलमोहर
फक्त उरावा शोध आपला
मनी असेही भलते येते.
गुलमोहर मोहरतो तेव्हा...!

~ चैतन्य दीक्षित

Subscribe to RSS - गुलमोहर मोहरतो तेव्हा