वृंदावनी सारंग !
यमुनेच्या जळावर, दुपारची सूर्यकिरणं पडली आहेत,
त्यांचा प्रकाश कदंबाखाली बसलेल्या शांतमुद्र श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावर पडतोय. जणू सूर्य त्या यमुनेमार्फत आपला नमस्कार पोहोचवतोय...किंबहुना, यमुनेमार्फत तो श्रीकृष्णाकडून तेज घेतोय.
कृष्ण डोळे मिटतो, एक दीर्घ श्वास घेतो... बाजूच्या लतावेली हलकेच शहारून आता हा वंशी हातात घेणार म्हणून जणू उत्सुक होतात. यमुनेच्या पाण्याचा आवाज तानपुरा होतो आणि कृष्ण कित्येक जन्मांतरांच्या स्नेहाला स्मरत, पंचमावरून स्थिर असा षड्ज लावतो!
षड्ज! सहा स्वरांना जन्म देणारा.. आपल्यातून सारं स्वरविश्व