पंचप्राण हे झाले आतुर तुमच्या दर्शनासाठी
सगुण रुपाने येऊन द्यावे दर्शन या भक्तासाठी
पंचप्राण हे झाले आतुर तुमच्या दर्शनासाठी
किती जन्म मी तिष्ठलो स्वामी तुमच्या भेटीसाठी
पंचप्राण हे झाले आतुर तुमच्या दर्शनासाठी
फिरलो अगणिक कृष्णा तिरावर तुम्हास शोधण्यासाठी
पंचप्राण हे झाले आतुर तुमच्या दर्शनासाठी
तव दर्शनास आसुसल्या माझ्या नयनांच्या ज्योती
पंचप्राण हे झाले आतुर तुमच्या दर्शनासाठी
किती कोटी नाम जप केले तुम्हास भेटण्यासाठी
पंचप्राण हे झाले आतुर तुमच्या दर्शनासाठी
धाऊन या हो लवकर या भक्ताच्या प्रेमापोटी
भक्तवत्सला...
भक्तवत्सला... उदास का तू?
दर्शन न हो म्हणून का होशी कष्टी?
निर्गुण, निराकार मी...
कधी शब्दांतून,
कधी चित्रांतून,
कधी नृत्यांतून,
कधी शिल्पांतून...
तूच केले मज सगुण साकार.
देऊळ हा तर केवळ पत्ता...
निसर्गातल्या चराचरात मी,
तुझिया मनात मी,
नकोत शंका...
नकोत चिंता.
बुद्धी हे तर शस्त्र तुझे...
घे परजूनि आता,
निर्मिसी रामबाण ऐसा...
जो वध करील राक्षसाचा.
- दवबिंदू
हे दार,
त्याच्या मागचं दार,
आणि त्या दाराच्याही मागचं दार...
अशी आत आत असलेली सगळी दारं
एक एक करत बंद करून
मी कालची एक पायरी चढून
'आत्ता'त आलेय!
हुश्श!
"आता ना, मला फक्त पुढचं पहायचंय"
असं म्हणून मागं वळते, तोच...
तिथे तुम्ही हजर,
तुमच्याही 'आत्ता'च्या दारात.
पण तुमचं दार,
त्याच्या मागचं दार,
आणि त्या दाराच्याही मागचं दार मात्र
पारदर्शक काचेचं...!
~ चैतन्य