जुन्या भग्न देवालयातील मूर्ती
अजूनी उभी देत आशीर्वचा
लकाके तमातून, ज्योतिर्मयाच्या
प्रकाशात, ताशीव दगडी त्वचा ।
कुणी उंबऱ्याशी थिजे, आत वाके
बघे यक्ष-गंधर्व दारावरी
निनावी परी ओळखीचे असे
गीत स्पंदे जणू काहि त्याच्या उरी.
स्मृतींच्या पटाची फडाडून पाने
खुली काळपोथी तयाच्या पुढे
कधी खोल गर्तेत जाई बुडोनी
कधी वाट तो ओळखीची चढे
जसे स्पष्ट होई पुढे चित्र त्याच्या
समोरी उभी ती स्वतः देवता,
दिसे त्यास तोही, तिला पाहताना
जशीच्या तशी कातळी कोरतां !
तिच्या मूक हास्यात स्वर्गीय लास्यात
नेत्रात अन् बोलक्या गुंतला
स्मरे ना दुजे, विस्मरे तो स्वतःला
जणू देव त्याला खरा भेटला.
शहारून गेला जशी पूर्ण झाली
तिची मूर्ति, त्याच्याहि हृन्मंदिरी
जरी भेटली ना पुन्हा एकदाही
तिचे वेड त्याच्या उरे अंतरी!
ठसे खूण कातीव कालप्रवाही
जरी जाहले भग्न देवालय
कळेना कुणा काल-आवर्तनाची
कशी अन् कुणी आखलेली लय
...
...
...
कुणाची तरी त्यास चाहूल लागे
वळे कोण हे पाहण्या मागुता
समोरील दारात देवालयाच्या
दिसे त्यास त्याचीच ती देवता!
क्षणार्धी परंतू पुन्हा ती दिसेना
पळाला त्वरे शोध घेण्या तिचा
जुन्या भग्न देवालयातील मूर्ती
हसे मंद, देऊन आशीर्वचा !
~ चैतन्य दीक्षित
क्लास _/\_
क्लास _/\_
धन्यवाद आसा _/\_
धन्यवाद आसा _/\_