जुन्या भग्न देवालयातील मूर्ती
अजूनी उभी देत आशीर्वचा
लकाके तमातून, ज्योतिर्मयाच्या
प्रकाशात, ताशीव दगडी त्वचा ।
कुणी उंबऱ्याशी थिजे, आत वाके
बघे यक्ष-गंधर्व दारावरी
निनावी परी ओळखीचे असे
गीत स्पंदे जणू काहि त्याच्या उरी.
स्मृतींच्या पटाची फडाडून पाने
खुली काळपोथी तयाच्या पुढे
कधी खोल गर्तेत जाई बुडोनी
कधी वाट तो ओळखीची चढे
जसे स्पष्ट होई पुढे चित्र त्याच्या
समोरी उभी ती स्वतः देवता,
दिसे त्यास तोही, तिला पाहताना
जशीच्या तशी कातळी कोरतां !
आवर्तन
किनार्यावर चालता चालता वाळूतील शिंपले उचलण्याची तुझी सवय अजुनही चांगलीच आठवते मला, आजही तशीच सवय आहे तुझी, फक्त किनारा असलेला समुद्र नाही आता, पण माझ्या मनाच्या गुढ डोहातील भाव बरोबर ओळखतेस, आणि पुन्हा आनंदाचे भरते आल्यासारखी बिलगतेस, जसा कधी सुंदर शिंपला मिळाल्यावर खुश व्हायचीस. किनार्यावरची बारीक रेती का चमकते हे तेव्हा कळलं मला, जेव्हा तु एक अख्ख खवलं (ज्याला तु अभ्रक आणि मी अर्भक म्हणायचो) माझ्या शर्टवर कुस्करलं होतस, मला तर भर दुपारी अंगावर चांदणं शिंपडल्याचा भास झाला होता तेंव्हा.
असे आज काही घडावे कशाने
तुझी याद यावी सुचावे तराणे...
कधी गायिलेले तराणे उमटता
अवेळीच यावे भरोनी नभाने...
नभाने करावी धरा चिंब आणि
धरेने नटावे नव्या वैभवाने...
नवे साज ल्यावे, नवे गंध प्यावे
नवे गंध वार्यात मिसळून जावे...
नवे गंध जावे नभाच्या प्रवासा
नभाला कळावे तुझे गूज त्याने...
नभाने कथावे खुळ्या पश्चिमेला
तिने लाजुनी सप्तरंगात न्हावे...
अशी सांज बघता नुरावेच भान
तुझ्या आठवांनी झुरावेच प्राण...
पुन्हा आज काही घडे हे अशाने
तुझी याद आली नि सुचले तराणे....