कर सर्वशक्तीनीशी प्रहार नियती
प्रतिकार करण्यास आता तयार मी
पराजीत परतशील हा शब्द माझा
लावलीस पणाला जरी सर्व माया
बाहुले तुझ्या हातातले; भ्रम तुझा
गुलाम तुझ्या मर्जीचे; गैरसमज तुझा
समयचक्राच्या कैदेची तु ही कैदी
अजून किती वेळ छळशील मला
संधी मीच नेहमी देत राहिलो तुला
गैरफायदा त्याचाच तु नेहमी उचलला
पण पुरे झाले; आता पुनः संधी देणार नाही
तुझी दखल आता मी खपवून घेणार नाही
उशीरा पोहोचलेल्या कविता,
थोड़या शिळ्या झालेल्या कविता
ज़ून्या डायरीतल्या एखाद्या
निखळलेल्या पानावरच्या कविता
सोनेरी उन्हासारख्या ऊबदार कविता,
काही थन्ड चान्दण्यात गोठलेल्या,
काही योध्यांच्या रंजक शौर्या गाथा,
धारदार शब्दान्च्या बाणावर खोचलेल्या
कधी खोलात शिरणार्या,
कधी अलगद तरंगनर्या
कधी सैलावलेल्या मिठीत धून्द
अलवार ओल्या हळदीत भिजणार्या...
एकतर्फी प्रेमसारख्या काही निनावी
कधी लाल, हिरव्याकन्च, काही गुलाबी
ऱक्ताने लिहीलेलया, रक्तबंबाळ करणार्या
गारूड़ करनर्या काही, नशील्या अन शराबी
हेरुनि वर्म सारे, का घाव झाले नेमके
आसवांविना दु:ख ते अजून झाले पोरके
ताणल्या स्मितातुनी, हास्य सारी खुणावती
चंद्रास ग्रासण्या छाया का पुढे सरसावती
भव्य प्रासादातुनी, सुखे सारी बोलावती
बंधण्या विहंग पिंजरी पाश का सरसावती
जरतारी वस्त्रांतुनी, सौख्य कशी वेडावती
सांधण्या जखमा उरिच्या शेले थिटे का पडती
भव्य सारी जीवने अन् भव्य सारे सोहळे
शाप अभावाचा का शून्याच्याच भाळी पडे
’राहत’ शल्यात लघुत्वाच्या विश्व देवकणी वसे
कालपटाचे सहप्रवासी का रडे का हसे
- राहत
कवितेला पण असते का स्वतःचे असे भावविश्व
की केवळ कवीच्या भावविश्वातच रममाण होते ती
पण भासते प्रत्येक वेळी वेगळीच आवर्तनागणिक
दिसतात तिचेही अनेक कंगोरे मनुष्य स्वभावाप्रमाणे
खरेच तिच्यात असतात का इतके अर्थ दडलेले
खरेच वसली आहे का चराचरात अनेक रूपात
की इथेपण तिच्यात जो तों शोधतोय स्वतःलाच
आणि देतोय तिलासुद्धा नश्वर मनुष्य जन्म
जसा निर्गुणाला फक्त मनुष्य रूपात बांधल्या प्रमाणे
ते काहीही असो,
आपण किमान एकाशी तरी भावरूप होणे गरजेचे
मग गवसेल ज्याचे त्याला स्वतःचेच पुष्पक विमान
- रोहन.
दररोज अंगवळणी असले तरी
एखादी पायरी एखाद्या वेळी चुकते
मग चुकत जातात हळूहळू
शंका कुशंकांची त्रिकोणे
आणि आपला शोध फिरत राहतो
गोल गोल, गोल गरगरीत वर्तुळाच्या परिघावर
माणसं येतात, स्पर्शून जातात
स्पर्शिकां सारखी, वर्तुळ भेदू शकत नाहीत
आपण आतच अडकून पडतो
चक्रव्यूहात...अभिमन्यू बनून
गावात प्रेमाचा पूर येतो, कविता वाहतात
गाव उध्वस्त होते, पूर ओसरून जातो
मागे उरतो, तो फक्त आठवांचा चिखल
गावात पसरलेला भावनांचा कुबट वास
विश्वासाच्या उडालेल्या चिंधड्या चिटकून
राहतात प्लास्टिक सारख्या...बाभळीला
जमीन मुकी झालीय
शुष्क फांद्यांवर दुःखी झालेली
पाखरे गप्प सगळं ऐकताय
रात्रीच्या नग्न शरीरावर
झोपेचे उलटे प्याले सांडताय
मेलेल्या मुडद्यांचा वास
फुलांच्या बगिच्यात पसरलाय
मृत्यू दात विचकतेय वस्त्यांमधून
समुद्र बघतोय सर्व किनाऱ्यावरून
म्हतारी खिडकीतून ओरडतेय
तिला कुठला धर्म लगाम घालेल आता?
कोणत वरदान गळा घोटेल तिचा?
त्या म्हतारीला सांगा
तिचा रोल संपलाय
आता पडदा पडेल
नाटक संपल
पण
खिडकीबाहेर मृत्यू तसाच फिरतोय!
©प्रतिक सोमवंशी
रस्त्याने जाताना एक काटा रुततो
मग तेच भळभळणार रक्त
छे, रक्त कसल माझ्या कविता त्या
काही मतले चपलीला चिकटतात
काही चारोळ्या पायात राहून जातात
काही रस्त्यावर नंगा नाच करू पाहतात
काही काट्याला बिलगून आभारही मानतात
काही ओळी ते रक्त गोठवायचा प्रयत्नही करतात
त्या साचलेल्या, अडगळीतल्या, निर्जीव,
नसांच्या बेड्यात जखडून ठेवलेल्या कवितांना
एकदाच स्वतंत्र मिळतच
आणि राहून जाते ती त्यांच्या आठवांची जखम
©प्रतीक सोमवंशी
कसला आवाज आहे हा?
इतका गेहरा, इतका शहारलेला
अंधारच्या गर्तेतून उगम पावणाऱ्या
एखाद्या नदीच्या शांततेसारखा
त्या अंधारात,
त्या शुकशुकाटात,
त्या आवाजाला,
घाबरून पळून जावं, की तिथेच थांबावं
निश्चल,
ठाम,
सगळ काही ऐकत,
आपण सोबत घेतलेल्या श्वासांचा आवाजही असाच काहीसा होता ना
घाबरू नकोस, पळू नकोस
तू ही ऐकून बघ, तुलाही जाणवेल
©प्रतिक सोमवंशी
(कुणीतरी email केलेला कोण होत त्याने कॉमेंट नक्की करा, मी जरा जास्तच busy होतो म्हणून पोस्ट नाही केलं काही)
जुन्या आठवणी छळत राहिल्या रात्र भर
मी चांदण्या मोजून पाहिल्या रात्र भर
तो किनारा मुळी नव्हता कुणा निराळा
मी लाटांच्या ओव्या ऐकल्या रात्र भर
वाटले रात्र साथ देईल पुन्हा एकदा
मी ओंजळी चंद्रास वाहिल्या रात्र भर
त्यांच्या सुंदरतेची सर नव्हती कश्यास
स्वर्गाच्या पऱ्या स्वप्नी दिसल्या रात्र भर
उगा कधी एक एक तारे मोजताना
'प्रति' तुझ्यावरच कविता लिहिल्या रात्र भर
©प्रतिक सोमवंशी
वास्तविकतेच्या भयाण जंगलात,
एखाद्या झाडाच्या आडोश्याला...
पाऊस झेलत पडलेल्या दगडातुन
कुणीतरी मूर्ती कोरून गेलेलं...
शिरावर कोसळणाऱ्या पाऊसधारा झेलत
या हिंस्त्र श्वापदांच्या किंकळ्यांनी भरलेल्या जंगलात
तिच्या गुप्तांगामधून आता शेवाळ जन्म घेतय
ती मूर्ती असली तरी जननी आहे
तिच्या ओल्या अंगावरून कित्येक वेलींना मार्ग मिळतो
तिच्या स्तनांवरून टपकणारा पावसाचा प्रत्येक थेंब
तिच्या बाटलेल्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करतो
तिला नाही माहीत कुठला विटाळ, कुठला रोग
कुठला दोष, अन कुठले हेवेदावे