रस्त्याने जाताना एक काटा रुततो
मग तेच भळभळणार रक्त
छे, रक्त कसल माझ्या कविता त्या
काही मतले चपलीला चिकटतात
काही चारोळ्या पायात राहून जातात
काही रस्त्यावर नंगा नाच करू पाहतात
काही काट्याला बिलगून आभारही मानतात
काही ओळी ते रक्त गोठवायचा प्रयत्नही करतात
त्या साचलेल्या, अडगळीतल्या, निर्जीव,
नसांच्या बेड्यात जखडून ठेवलेल्या कवितांना
एकदाच स्वतंत्र मिळतच
आणि राहून जाते ती त्यांच्या आठवांची जखम
©प्रतीक सोमवंशी
निरव रात्रीच्या शांत प्रहरी
स्ट्रीटलॅम्प च्या शांत, पिवळ्या प्रकाशात
तो रस्ता जणू शांतपणे वाहणाऱ्या नदीगत भासतो
त्या पाण्याच्या चादरीला विस्कटून,
त्याच्या शांततेला भंग करणाऱ्या
एका पाठोपाठ एक जाणाऱ्या गाड्यांच्या
इंजिनाची घरघर,
हॉर्नचे कर्कश आवाज
या सर्वांच्या मध्ये कधी ऐकू येते,
कधीतरी
कुणीतरी
कुठेतरी
शेजारच्या पायवाटेने
शिशिराची पानगळ तुडवत चाललेलं
मी खिडकीत उभा राहून
ते पानांचं साग्रसंगीत ऐकत असतो
समोरच्या चंद्राला बघून स्ट्रीटलॅम्प त्याचा हेवा होत असेल ना?
माझ्याकडे नाही आज ,
एखादी गोष्ट ऐकवायला,
ना एखादा किस्सा आहे सांगायसारखा
बस काही चुरगळलेली पाने आहेत, डस्टबिन शेजारी पडलेली
त्यांना आता त्यांच्या अंगावर पेनाची खरखर नकोय
ना हवाय शाईने तयार झालेला ओलावा
ओल्या काँक्रीटच्या एकटेपणात, डायरीच्या पानातला गुलाब तेवढा दरवळतोय
पण पाने कोरीच आहेत, टाईप रायटरही धूळ खात पडलाय
त्याच्या किबोर्ड वरची अक्षरे अजूनही वाट पाहतायत
कुणीतरी त्यांना त्यांच्या क्रमाने लावायची
समोर पडलेल्या 'दा विन्सी कोड' ला पाहून
भिंतीवरची 'लिओ' ची मोनालीसा
मध्येच हसत आहेे, तर कधी मध्येच रुसते आहे
कधी एक ओळ एका थेंबासारखी येते
कधी दोन तीन तर कधी पूर्ण
कविताच पाऊस बनून येते
काही ओळी मनाच्या गर्भात झिरपून जातात
काही ओळी पापण्यांवर दव बनून राहतात
काही बरसतात, काही कोसळतात,
काही रिमझिम सरींसारख्या भुरभुर करत राहतात
वाटते कधी छत्री बंद करून भिजाव
त्या प्रत्येक ओळीला अंगाखांद्यावर खेळवाव
एखादी ओळ वाहून जाते नाल्यातून
एखादी कुणीतरी साठवून देखील ठेवत
कुणाच्या गावात शुष्कतेचा दुष्काळ असतो
कुणाच शहर एका पावसात पाण्याखाली जात
कुणाच अंगण साफ होत, कुणाच्या दारात भावनांचा चिखल होतो
वास्तविकतेच्या भयाण जंगलात,
एखाद्या झाडाच्या आडोश्याला...
पाऊस झेलत पडलेल्या दगडातुन
कुणीतरी मूर्ती कोरून गेलेलं...
शिरावर कोसळणाऱ्या पाऊसधारा झेलत
या हिंस्त्र श्वापदांच्या किंकळ्यांनी भरलेल्या जंगलात
तिच्या गुप्तांगामधून आता शेवाळ जन्म घेतय
ती मूर्ती असली तरी जननी आहे
तिच्या ओल्या अंगावरून कित्येक वेलींना मार्ग मिळतो
तिच्या स्तनांवरून टपकणारा पावसाचा प्रत्येक थेंब
तिच्या बाटलेल्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करतो
तिला नाही माहीत कुठला विटाळ, कुठला रोग
कुठला दोष, अन कुठले हेवेदावे
रात ठिबकते साथ देऊनी उनाड तळ्याकाठी
त्याच किनारी ठरल्या होत्या आपल्या भेटीगाठी
गंध माळूनी नक्षत्रांचा फुलली राने आहेत
माझी म्हणाया रितेपणात या माझी पाने आहेत
लख्ख पडल्या चंद्रप्रकाशात ही रात धूसर भासते
लागोलाग उठल्या वलयांमध्ये तुझी सावली दिसते
मला भेटाया तळ्यात उतरले सारे तारे आहेत
माझी म्हणाया रितेपणात या माझी पाने आहेत
धुंद वाहत्या वाऱ्यावरती औदुंबर सळसळते
पायाखालच्या पाचोळ्यातुन कुठे व्याळ वळवळते
श्वास रोखुनी अंधारातून सावज धावते आहे
माझी म्हणाया रितेपणात या माझी पाने आहेत
एक एक थेंब अवकाशातून कोसळताना
एकदा अंगणी उभी राहा
हात पसरवून ते पाणी अंगावर झेल
आठवेल आता तुला
एक एक ओळ - माझ्या कवितेची
ज्या मी सुरवातीला तुझ्यासाठी लिहिल्यात
नाही म्हटल्या तरी आठवणीत राहिल्यात
काल मी तिच्यासमोर ठेवून दिली
मी लिहिलेली काही पाने
मागच्या काही महिन्यात लिहिलेली
तिच्या ओठांवर लिहिलेल्या चारोळ्या
तिच्या पाठीवर लिहिलेल्या कविता
अन तिच्यावर लिहिलेल्या गजला
तिच्या केसांत गुंफलेली त्रिवेणीही होतीच
त्या फक्त ओळी नव्हत्या , प्रत्येक ओळ ती स्वतः होती
कशीही का असेना पण माझी होती
कित्येक मैफिली गाजवल्या होत्या मी
त्या ओळींवर, तिच्या जीवावर
तिने पान उचलले, ती वाचू लागली
माझी नजर तिचे भाव टिपू लागली
तिने हळूच एक भुवई वरती केली
एक उसासा टाकला,
पान खाली ठेवून दिल