Submitted by प्रतिक सोमवंशी on 26 June, 2019 - 10:36
एक एक थेंब अवकाशातून कोसळताना
एकदा अंगणी उभी राहा
हात पसरवून ते पाणी अंगावर झेल
आठवेल आता तुला
एक एक ओळ - माझ्या कवितेची
ज्या मी सुरवातीला तुझ्यासाठी लिहिल्यात
नाही म्हटल्या तरी आठवणीत राहिल्यात
बघ एखादी ओळ, तुझ्या केसांवरून घरंगळत असेल
तुझ्या कानातल्या डूलांवर झोके घेत असेल
काही टुकार ओळी तू झटकून टाकशील
काही चुकार शब्द ओढणीला लटकून राहतील
काही नटखट कडवे तुझ्या ओठांवर बसतील
बघ अंग शहारून येईल, पाऊस तुला मिठीत घेईल
चिंब चिंब भिजूनही प्रत्येक ओळीत माझी ऊब येईल
मी नसेल कदाचित, तुझ्यासोबत भिजायला
पण तू लिहिशील ना? मला भिजवायला कविता
तुझ्या ओळी सांगून जातील
तुझ्या भिजलेल्या देहाबद्दल, किती मोहक दिसत होतीस तू
तुझ्या ओल्या केसांबद्दल, तुझ्या लाल ओठांबद्दल,
मीही भिजत राहील, तुझ्या कवितेतली ऊब घेऊन
©प्रतिक सोमवंशी
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जबरदस्त लिहिलंय!
जबरदस्त लिहिलंय!
वाह
वाह