marthi poem

भेटीगाठी

Submitted by प्रतिक सोमवंशी on 27 June, 2019 - 09:30

रात ठिबकते साथ देऊनी उनाड तळ्याकाठी
त्याच किनारी ठरल्या होत्या आपल्या भेटीगाठी
गंध माळूनी नक्षत्रांचा फुलली राने आहेत
माझी म्हणाया रितेपणात या माझी पाने आहेत

लख्ख पडल्या चंद्रप्रकाशात ही रात धूसर भासते
लागोलाग उठल्या वलयांमध्ये तुझी सावली दिसते
मला भेटाया तळ्यात उतरले सारे तारे आहेत
माझी म्हणाया रितेपणात या माझी पाने आहेत

धुंद वाहत्या वाऱ्यावरती औदुंबर सळसळते
पायाखालच्या पाचोळ्यातुन कुठे व्याळ वळवळते
श्वास रोखुनी अंधारातून सावज धावते आहे
माझी म्हणाया रितेपणात या माझी पाने आहेत

Subscribe to RSS - marthi poem