माझे आवडते प्रश्न...
डोंगराच्या टकलावरती,
हिरवे कुंतल कसे उगवती?
मेघांच्या डोळ्यांतून काळ्या,
अश्रू का हो ओघळती?
आकाशाच्या अंगावरती,
रोजच शर्ट निळा कसा?
धरतीला पण रोज नव्याने
मिळतो नवा झगा कसा?
सरसर धावत येते सर पण,
कुशीत आईच्या जाते का?
हिरवे पाते कुठून येते?
असते त्यांचे नाते का?
झाडांच्या बाहूंवरती,
पक्षी आनंदे झुलती,
पंखांचे बळ; खोलण्या
दार नभाचे पुरती?