आवर्तन
किनार्यावर चालता चालता वाळूतील शिंपले उचलण्याची तुझी सवय अजुनही चांगलीच आठवते मला, आजही तशीच सवय आहे तुझी, फक्त किनारा असलेला समुद्र नाही आता, पण माझ्या मनाच्या गुढ डोहातील भाव बरोबर ओळखतेस, आणि पुन्हा आनंदाचे भरते आल्यासारखी बिलगतेस, जसा कधी सुंदर शिंपला मिळाल्यावर खुश व्हायचीस. किनार्यावरची बारीक रेती का चमकते हे तेव्हा कळलं मला, जेव्हा तु एक अख्ख खवलं (ज्याला तु अभ्रक आणि मी अर्भक म्हणायचो) माझ्या शर्टवर कुस्करलं होतस, मला तर भर दुपारी अंगावर चांदणं शिंपडल्याचा भास झाला होता तेंव्हा.
आठवणी मागे का उरतात?
अन् आयुष्याला का पुरतात?
कालौघात बरच काहि बदलतं म्हणतात, पण काही आठवणी कशा विसरता येतील? पडलेली सर्वच स्वप्ने नाही लक्षात रहात, पण काही कायमची घर करून राहतात मनात, जी विसरता म्हणता विसरता येत नाहीत... आठवतं, मंद धुंद दरवळणारा मोगरा अन् तानपुर्याचा स्वर, गारठवणार्या त्या गोड थंडीत उबदार रजईत झालेली तुझी संगमरवरी गुळगुळीत मुर्ती? त्या नीरव मंद अंधारात सुद्धा धगधले होते शृंगाराचे अग्नीकुंड, परस्परांना चेतवुन, अतृप्त देहाच्या किती समिधा अर्पण केल्या होत्या कुणास ठावुक? अन् भडकूनही शांत न होणार्या अशा अनेक ज्वाळा उसळल्या होत्या, ज्या पुर्णपणे शांत होतच नव्हत्या ते आठवतं, पण किती काळ ती आवर्तने सुरू होती ते नाही आठवत, फक्त आठवतो, तो पहाटे पहाटेे आलेला तृप्ततेचा थकवा, पुन्हा पुन्हा उसळू पाहणारा. सकाळी सकाळी त्या पहाट थंडीत जाणवत होता तो अंग प्रत्यांंगाला मोगर्याचा सुगंध, सुखावलेली तु तशी शांत होती, मी किलकिल्या डोळ्यांनी तुझ्या गालावरला तृप्तीचा रक्तिमा पहात होतो, हळूच तु माझा हात हातात घेतला व अलगद जवळ ओढलस, तेव्हा मला पुन्हा पुन्हा संगमरवर गुलाबी भासला हे विसरणं कस शक्य आहे?
जुना किनारा निरखतांना तो हरवलाय आता असं वाटतं, काळवंडले आहेत तेथील शिंपले आणि रेतीची चमक सुद्धा, मी सहन करतो हे परिवर्तन, हा बदल पण जेव्हा जेव्हा तुला पाहतो तेव्हा तुझ्या डोळ्यात तोच स्वच्छ किनारा दिसतो आणि पापणीच्या उंबरठ्या पर्यंत तुडुंब भरलेले तुझे डोळे कधी ओसंडून वाहतील याचा भरवसा नाही रहात. एरवी तसा मी धीरोदत्त, पण तुला अशा अवस्थेत पाहिल्यावर माझा धीर सुटू लागतो, हे तुला समजतं, मग तु स्वतःला सावरत मलाही सावरतेस, माझ्या खांद्यावर हात ठेवुन डोळ्यातील उसळलेली लाट अलगद परतावून देतेस, कसं जमत तुला आणि कुठून येतो गं तुझ्यात एवढा सोशिकपणा?
©शिवाजी सांगळे
अहाहा... किती रोमँटिक...
अहाहा... किती रोमँटिक... नाजूक... अलगद वगैरे.
खूप म्हणजे खूपच आवडलं... शब्दसंपदा तर अगदी.
कसं जमत तुला आणि कुठून येतो गं तुझ्यात एवढा सोशिकपणा? >> हे वाचून म्हणावसं वाटतंय ....कसं जमतं तुम्हाला... कुठून येतो एवढा नवनिर्मितीचा सूज्ञपणा.
आपण आठवणीने सर्व लेख वाचून
आपण आठवणीने सर्व लेख वाचून स्पष्ट मतं मांडता या बद्दल आपले कौतुक वाटते.
आपलं प्रोफाइल पाहता आपण अमेरिकेत असूनही खूप छान मराठी समजून घेता व लिहिता हे खासच आहे.
हे तर काव्य आहे , बकुळिच्या
हे तर काव्य आहे , बकुळिच्या फुलांच्या ओंजळीत्तून आसमंतात दरवळत ,अश्रूंम धून गालावर ओघळणारं !
बहोत अच्छे !