सारं गतिमान झालंय हल्ली...
त्यामुळे तोल जातो माझा
भरधाव वेगानं कुणीतरी समोरून जातं...
आणि मग बाचकायला होतं!
'विसावा' घेणं म्हणजे,
पळण्याच्या शर्यतीत विसावा आल्याचं भासतं!
मग मी देखील पळतो...
अगदी ऊर फुटेस्तोवर, धावत सुटतो
विक-डेज ला गावं शहरांकडे पळतात...
अन विकेन्ड ला शहरं गावांकडे
मधे आहेत फक्त भरधाव धावणारे रस्ते...
अन त्यासाठी भरावे लागणारे टोल!
पडवीत आडवा होऊन, वाचायला घेतलेलं पुस्तक...
ते तसंच पडून आहे कधीचं
फडफडताहेत ती केवळ वाचलेली पानं...
न वाचलेलं तसंच, चहाच्या कपाखाली बंदीस्त
उन्हा तानातून शहरं, गावं हिंडत फिरतो
घामाघूम होतो, तेव्हा वाटतं...
बिनझाडाच्या सावलीतही थांबावं थोडं
मग् घामाच्या थेंबांतूनही गारवा येतो
पडवितलं पुस्तक उचलावं...
भरधाव रस्त्यातून एखादी पाऊलवाट काढत,
शहरं आणि गावांपासून दूर जावं...
विसाव्याचं एक झाड शोधावं...
अन चहाच्या कपाचा शिक्का शोधून,
उरलेलं निवांत वाचत पडावं...
सुंदर. हे खरे आहे.
सुंदर. हे खरे आहे.
छान कविता..
छान कविता..
छान कविता.
छान कविता.