आलीच आहेस तर...

Submitted by पॅडी on 5 April, 2024 - 01:03

आलीच आहेस भेटीला तर
आरामात; नीट टेकून बस
टणकाय दोघांमधील माती
तरी टिकवून आहे कस ...

मोकळी ढाकळी देहबोली
शब्दांना अंगांग सैलावू दे
खळाळत्या शुभ्र हास्याला
थोडे पात्राबाहेर फैलावू दे...

रुचेल न रुचेल; भीतीपोटी
दाबू नकोच आतले कढ
उधळ बंधार्‍यांचे मनसुबे
जरा हमसून हमसून रड...

कशाला उगाच त्रास म्हणून
नाकारू नकोस वाफाळता चहा
मनावरचे मळभ दूर सारून
एकदा माझ्या आरपार पहा...

सावध; सजग जगण्याचा दंभ
क्षणभरासाठी सोडून देऊ
हातात हात घेऊन ; परत -
टिपूर चांदण्यात फिरून येऊ...

***

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह..
(बंधारा, पात्र या शब्दांमुळे नदी वगैरे सुरुवातीला वाटलं होतं)

मस्तच

टणकाय म्हणजे काय ?

फ्लो मस्त आहे कवितेचा. मंचीय कविता म्हणून वाचन सुरेख होईल.
सौमित्रच्या शैलीत वाचून पाहिली..

>>> टणकाय म्हणजे काय ? टणक आहे. ( जसे : माहिताय - माहीत आहे ? )

>>>>>> फ्लो मस्त आहे कवितेचा. मंचीय कविता म्हणून वाचन सुरेख होईल.
सौमित्रच्या शैलीत वाचून पाहिली..
रघू आचार्य - मन:पूर्वक आभार..धन्यवाद Thanks for the appreciation...

छान!

टणकाय दोघांमधील माती
तरी टिकवून आहे कस ...

खळाळत्या शुभ्र हास्याला
थोडे पात्राबाहेर फैलावू दे.

विशेष आवडल्या

वा वा! खूपच सुंदर जमलीय,
"रुचेल न रुचेल... हमसून रड..." >> हे तर छानच,

सौमित्रच्या शैलीत वाचून पाहिली..>> correct, मी पण... Happy
टणकाय माती नाही कळलं

@गौरी जी- खूप खूप आभार प्रतिसादासाठी..!

>>> टणकाय म्हणजे काय ? टणक आहे. ( जसे : माहिताय - माहीत आहे ? )