कवितेच्या ठिपक्यांमधून...

Submitted by पॅडी on 12 April, 2024 - 01:21

कवितेच्या पांढऱ्याशुभ्र ठिपक्यांमधून
व्यक्त होणारी माझी भाविकता
पुरेशी नसते म्हणून की काय
तू नित्तनेमाने ढकलतेस माझा निगरगठ्ठ देह
कुठकुठल्याशा जागृत देवस्थानाच्या दिशेने…

मला भिववत-चिथावत नाही पाप
लोभवत-खुणावत नाही पुण्य
तरी चालतो निमूट –
नुकत्याच खरेदी केलेल्या
गुराच्या गळ्यातल्या फुटक्या घुंगरासारखा
आवाजवीहीन – तुझ्या पाठोपाठ

सव्वा किलो कंदी पेढे; एकशे एकवीसची पूजेची थाळी
एक्कावन रुपयांचा
पाणी शिंपून शिंपून कृत्रिम टवका मारणारा
सडेलेदार पुष्पहार,
माझ्या स्थितप्रज्ञ डोळ्यांत
लाखो-करोडोच्या ओझ्याखाली
आधीच दबून-पिचून गेलेल्या
देवाच्या वाढीव दुरावस्थेचे विचार

“ येथे जोडे चपला काढू नयेत ” च्या नाकावर टिच्चून
तू लीलया भिरकावतेस सँडल टोकदार
एरवी घरभर दाणदाण वाजणारी तुझी पावले
पडू लागतात गर्भारणीच्या संथ लयीत हळूवार

गर्भगृहाच्या दारावर विराजमान
नाव-गाव-पत्ता हरवलेल्या
गुळगुळीत मुर्तीच्या शिरावर
तू भक्तिभावाने फूल ठेवते,
तू पाठमोरी व्हायचे निमित्त-
लबाड ; टू ऽ णकन उडी मारून
तुझ्या सैल केसात स्थिरावते!

निर्माल्य होऊन कुजण्यापेक्षा
केसात मिरवण्याच्या
आदीम; करंट्या मोहावर
मी फिस्सकन हसतो,
त्या वटारलेल्या डोळ्यांच्या गावी नसते-
ठीक मागे उभा थुलथुलीत भक्त
अर्धवट मिटल्या डोळ्यांनी
तुझ्या ओझरत्या स्पर्शाचे स्वर्गसुख भोगतो

कंठातल्या सुस्वर प्रार्थनेसारखे
निनादत्या घंटानादाचे निमित्त-
उजवा हात उंचावायला,
भक्तगणातला शिकारीसमूह टपून
तुझ्या पदराआडून डोकावणारा
मांसल पोटाचा गुबगुबीत ससा गोंजारायला

सोवळ्यातल्या पुजार्‍याकडे ताट सोपवून
तू टेकतेस माथा मनोभावे,
तुझ्या देहभर डोलत्या पिकात भिरभिरतात
असंख्य नजरांतले हिर्वे रावे...!

मग तुला रुचेल पटेल असा
साष्टांग प्रणिपात करताना
काय मागावे…काय सांगावे देवाला
ह्याचे कुठलेच राहत नाही भान,
नुसताच अवघडून खुळ्यागत उभा
मी देहाची करून भाबडी कमान

तोबा गर्दीतून अंग चोरत, वाट काढत
एकदाचे बाहेर पडल्यावर
तू अनुभवतेस तसे –
पवित्र, मंगल , प्रसन्न, स्फटिकासारखे वगैरे
माझ्या आत काही काहीच शिल्लक राहत नाही,
जागृत देवस्थानाच्या प्रवेशद्वारापुढची
एव्हाना विस्कटून गेलेली
पांढर्‍या शुभ्र ठिपक्यांची रांगोळी तेवढी
काही केल्या मनातून जात नाही...
***

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

नाव-गाव-पत्ता हरवलेल्या
गुळगुळीत मुर्तीच्या शिरावर
तू भक्तिभावाने फूल ठेवते,...
आवडलीच!

>>>>>>>>>नुकत्याच खरेदी केलेल्या
गुराच्या गळ्यातल्या फुटक्या घुंगरासारखा
आवाजवीहीन – तुझ्या पाठोपाठ

अस्सल मराठी मातीतील उपमा. फार फार आवडली.

>>>>>>>तुझ्या देहभर डोलत्या पिकात भिरभिरतात
असंख्य नजरांतले हिर्वे रावे...!
क्या बात है!!

कविता खूपच आवडली.

केशवकूल ,
अ'निरु'द्ध जी ,
रूपाली विशे - पाटील,
सामो ,
abhishruti -

आपणा सर्वांचे मन:पूर्वक आभार... सुंदर , समर्पक प्रतिसादासाठी...!!

>>>> अस्सल मराठी मातीतील उपमा. फार फार आवडली.
सामो... गावच्या मातीत वाढल्यामुळे, आज शहरात स्थलांतरित झालो असलो तरी अस्सल मातीचा गंध तना -मनाला चिकटून आहे तो आहेच. बहुदा त्याचाच हा परिणाम..!! खूप खूप धन्यवाद...!!!