मेघ...
मेघ दाटले नभात सारे
हलके हलके वाही वारे
सळसळत्या त्या उन्हाळ्याने
पळ काढला आज कसा रे
थेंब बरसले भूमी वरती
रिमझिम रिमझिम नाद ते करती
कडकडाट तो नभी गुंजला
पावसाला आली भरती
झरझर झरझर झरती धारा
वेग घेऊनी आला वारा
चिंब भिजविले झाडे वेली
धुंद झाला सारा नजारा
जिकडे तिकडे गंध पसरला
मातीचा सुगंध पसरला
तरसत होती धरणी ज्याला
आज तिचा तो विरह सरला