कसं सांगू ?

Submitted by अदिती ९५ on 24 May, 2022 - 07:13

जेव्हा जेव्हा आपली
उराउरी भेट होते
तेव्हा तेव्हा काहीतरी
अलवार स्पर्शून जातं
कसं सांगू नक्की काय होतं?
तुझ्या हाताचा विळखा
देत राहतो ऊब मऊसूत
डोळे झरत राहतात
त्या क्षणीचा आनंद
की कैक दिवसाचं दुःख
कसं सांगू नक्की काय असतं?
थोडं विसावल्यावर
कान ऐकत राहतो तुझी स्पंदने
आणि मी त्यामागचं अव्यक्त,
डोक्यावरून फिरत राहतो
तुझा हात
ओठ अलगद भाळावर
विसावतात
त्याक्षणी मी उरत नाही
तुझं मला व्यापून टाकणं असतं
कसं सांगू नक्की काय होतं?
भेट संपते, तू निघतोस
निघताना म्हणतोस
मी तुझ्यातच आहे
तरीही त्या क्षणीच
पुढच्या भेटीची आस लागते
आणि ह्या मधल्या काळात
कसं सांगू नक्की काय होतं?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users