सुटका
हाय ही सुरुवात का अंत याला मी म्हणू?
लाभली सुटका मला, का तरी येते रडू?
सर्व, अगदी सर्व हे, नेहमी होते तुझे,
फक्त ते केले कधी, आपुले नाहीस तू.
उसवले नाते कधी, समजले नाही मला
बंध नव्हते रेशमी, ठिगळ होते ते जणू
तू दिलाची जान, पण सांगणे ही गौण हे,
प्रेयसी होतीस पण तू अता त्याची वधू.
पण तुझे भागेल का अन् कसे माझ्याविना?
सागराची प्यास तू, मी वर्षावाचा ऋतू.
रोखण्या मजला तुम्ही, पंख माझे छाटले,
मी बघा पंखांविना लागलो आता उडू.
कर पुन्हा बंधी तुझा, तू मला रे जीवना,
हा सुखी संन्यास मज, येत नाही रे रुचू