Submitted by पॅडी on 28 April, 2024 - 23:28
गर्भगृहामधल्या
टिमटिम प्रकाशात
टकमका पाहतो तुला…
तू मला पाहतोस की नाही
याबद्दल असू शकते दुमत
सतराशेसाठ विवंचना
जगण्याचे घोर
कायबाय शिजत असते
सतत अव्याहत
सडक्या टाळक्यात
चालूच असेन
टकळी तुझीही अखंड
पण खात्री करायची नसते सोय
क्वचित भीती
फुटायचे श्रद्धेला फाटे
ठेवता थोडी फट
बोलाबसायची सोय
तर पिटतो चकाटया
काढतो उणेदुणे
उखाळ्यापाखाळ्या,
प्रत्यक्षात तुझ्यामाझ्यात
नितांत सुंदर पोकळी
गहनगूढ मौनाच्या
भिरभिरत्या पाकोळ्या
... शेवटी
गजबजलेल्या रस्त्यावरून
दोन उदासीन, तटस्थ बघ्यांनी
ओझरता स्पर्शही होवू न देता
जावे ओलांडून परस्परांना
तसे -
क्षणभराच्या सुदीर्घ पॉजनंतर
निघून जातो आपण
आपापल्या निर्धारित वाटांनी
एकएकटेच...
***
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा