फांदीचे घरटे झाले.
©️ चन्द्रहास शास्त्री
येताच फांदीवरी तू, फांदीचे घरटे झाले
हवे तसे सारे झाले, स्वप्नातले घर ते झाले.
तुटल्या त्या पानाला, देठ ते पुन्हा जुळाले
अधांतरी जे राहीले , ते प्रतिष्ठित असे झाले.
बाणा आपुला करारी, रण जिंकले मग निमाले
फिनिक्सची उंच भरारी, घेण्यास मन सज्ज झाले.
पारिजाताचे सकाळी, निज आख्यान मज कळाले
खुडले खोड कुणी ज्याचे, झाड तेच सजीव झाले.
अश्याच एका आळसावलेल्या रविवारी घराच्या गॅलरीत अचानक एका अनाहूताची लगबग चालू आहे असे दिसले...
मागे एक मला न सुटलेले कोडे तुम्ही वाचले असेलच. आणि मग एका नवीन गोष्टीला सुरुवात झाली. मार्चचा शेवट आणि हे महाराज झोक्यावर बसून गोड गाऊ लागले. मैत्रिणीला बोलावू लागले.
मध्येच आत येऊन पाहणी करून गेले.
सकाळी उठले तीच एका मंजुळ आवाजाने. तसा नेहमी येत असे, पण आज जरा जास्तच जवळून अन खणखणीत. वृटिव्हSS, वृटिव्हSS, वृटिव्हSS
अन बाहेर हॉलमध्ये आले तर चक्क टेरेसच्या बांधावर दोन बुलबुल साद घालत बसले होते. आधी टेरेसवरच्या बागेत सगळ्या झाडांची पाहणी त्यांनी केली.
मग उडून गेले. साधारण अर्ध्या तासाने पुन्हा साद आली. वृटिव्हSS मी स्वयंपाकघरात काम करत होते, तर सुळ्ळ्कन बुलबुल हॉलमध्येच दाखल झाला.