आमच्या घरी आलेले अनाहूत पाहुणे

Submitted by इस्पीकचा एक्का on 27 November, 2014 - 12:12

अश्याच एका आळसावलेल्या रविवारी घराच्या गॅलरीत अचानक एका अनाहूताची लगबग चालू आहे असे दिसले...

अनाहूत असला तरी त्याने पटकन भुर्रकन उडून जाऊ नये असे वाटण्याइतका तो आकर्षक होता. तरीसुद्धा या पाहुण्याची इतकी कसली गडबड चालली आहे याबद्दलही कुतूहल होतेच. म्हणून त्याला दिसणार नाही असा दरवाज्याआड उभा राहून त्याला पाहू लागलो आणि ध्यानात आले की गॅलरीतल्या टांगलेल्या एका कुंडीवर त्याने अगोदरच पथारी हक्क प्रस्थापित केला होता. त्या कुंडीतल्या रोपाच्या आधाराने त्याने बरेचसे "बिल्डिंग मटेरियल" साठवायला सुरुवातही केली होती...

.

मग घरातील सगळेच पाहुण्याला त्रास होणार नाही याची न सांगता ठरवता काळजी घेऊ लागले. जसे की, गॅलरीत जाताना दरवाजा हळुवारपणे उघडणे, चोरपावलांनी आणि अचानक हालचाली न करता आपले काम आटपून पटकन परतणे, वगैरे. पण आमचा पाहुणाही एका दिवसभरात इतका निर्ढावला होता की गॅलरीतल्या झाडांना पाणी घालणे, कपडे वाळत घालणे, इत्यादी कामे चालू असतानाही तो आमच्याकडे अजिबात लक्ष न देता आमच्या घरात, आमच्या पूर्वपरवानगीशिवाय बिल्डिंग मटेरियल जमा करणे आणि स्वतःचे बिनभाड्याचे घर बनवणे हे उद्योग चालू ठेवू लागला.

तीन-चार दिवसात बहुदा त्याच्या मनासारखे घर बांधून तयार झाले असावे. कारण त्याच्याबरोबर एक जोडीदारीण दिसू लागली. आता तुम्ही म्हणाल की जोडीदारीणच कशावरून ? कारण असे की, ती बांधकामात अजिबात सहभाग घेत नव्हती. उलट मान वाकडी करून करून ती घरट्याचे वेगवेगळ्या कोनातून बराच वेळ निरीक्षण करत असे आणि मग इथली काडी उपस, तिथली काडी उपस आणि बाहेर फेकून दे असे मात्र करत असे. आलं ध्यानात ? Happy

असे अजून दोन-तीन दिवस झाल्यावर मात्र बाईसाहेबांच्या मनाप्रमाणे घर बांधून झाल्याचे दिसले...

मग दोघांचे येणे जाणे, गॅलरीचा पूर्ण ताबा आपल्याच मालकीचा आहे असा हक्क बजावणे चार-पाच दिवस चालू होते. आणि अचानक घरट्यात दोन अंडी असल्याची खबर आमच्या घरभर पसरली. कुतूहल न आवरल्याने पाहुणे आजूबाजूला नाहीत असे पाहून आम्ही शिडी लावून त्या नवागत अंड्यांचा फोटोसेशन केला...

अचानक डोक्याभोवती वेगात भिरभिर ऐकू येऊ लागली आणि अणुकुचीदार चोचींचा हल्ला होण्याअगोदर आम्ही काढता पाय घेतला !

दुसर्‍या दिवशी तसाच फोटोसेशनचा प्रयत्न केला आणि दिसले की दोन्ही अंडी गायब !...

पुढचे काही दिवस नुसती चुक् चुक् चालू होती. "नको काढायला हवे होते ते फोटो. गेले ना आता ते अंडी घेऊन." असेच वाटत राहिले. त्याबरोबरच, मनात "इतके दिवस होतो ना आम्ही आजूबाजूला. आताच कशाला इतकं घाबरायला हवं होतं?" असाही जळफळाट चालू होता. Sad

चारपाच दिवसांनी अचानक कुंडीत हालचाल दिसली आणि ध्यानात आले की घरट्यात मादाम ठिय्या मांडून बसलेल्या आहेत!...

येथून पुढे आई-बाबांपैकी एक आलटून पालटून अंड्यांवर जवळ जवळ सतत बसून राहू लागले. अर्थात मागच्या अनुभवानंतर मीही फोटो काढायला घरट्याच्या जवळ जायची हिंमत करू शकलो नाही... कोण जाणे आमचे पाहुणे परत अंडी उचलून दुसरीकडे गेले तर काय ? त्यापेक्षा जरा अंतर ठेवून फोटो काढणेच बरे ! त्यासाठी मात्र त्यांनी मोठ्या आनंदाने पोझेस दिल्या...

.

असेच दहा-पंधरा दिवस गेले असतील. एकाएकी आमच्या पाहुण्यांची परत धावपळ सुरू झाली. दोघांपैकी एकजण खाणे आणून इवल्याश्या चोचीत भरवू लागले. आता कोणी जवळ आल्यास आमचे पाहुणे जरा जास्तच आक्रमक होत होते. आम्हीही घरट्याच्या फार जवळ न जाणेच पसंत केले. त्यामुळे चिमणे घास भरवण्याचे इथे देण्यासारखे फोटो मिळाले नाहीत. पण ते कौतुक बघण्याचा आनंद मात्र मनात भरून ठेवला आहे.

पुढच्या काही दिवसांत पिलांची वाढ आश्चर्यकारकरीत्या वेगात झाली. एकदा आई-वडील दोघेही एकाच वेळेस खाणे आणण्यास गेले असताना काढलेल्या खालील चित्रात ती दिसून येते...

दोन्ही पिलांनी एकमेकाच्या अंगावर अंग टाकून मस्त ताणून दिली होती. या अगोदर फक्त कोंबडीचीच पिले इतक्या जवळून पाहिली होती. पूर्वी कधीच आकाशात भरारी घेणार्‍या पक्षाच्या घरट्यातली इतकी लहान पिले पाहिली नसल्याने इवल्याश्या अंड्यांतून जन्मलेली पिले काही दिवसांतच इतकी मोठी झाल्याचे पाहणे मोठे रोमांचक होते !

दोन एक मिनिटेच हा आनंद टिकला असेल. जवळच्या झाडीतून आई-बाबा दोघेही माझ्या दिशेने झेपावले आणि मला डोक्याचा बचाव करत जलद गतीने यशस्वी माघार घ्यावी लागली. यानंतर मात्र परत असे करून पाहुण्यांना त्रास न देण्याची प्रतिज्ञा केली. परंतु पिलांना भरवण्याचा सोहळा पाहण्याचे रोजचेच व्यसन मात्र लागले होते.

अजून काही दिवस गेले असतील, एकाएकी "अरे, पिले घरट्यातून खाली उतरलीत." असा पुकारा झाला. दोन्ही पिले गॅलरीत खाली ठेवलेल्या कुंड्यातील झुडुपावर तोल सांभाळत डुलत होती...

एका झुडुपावर बसून एक पिलू डुगडुगतच आपले पंख साफ करत होते. तर आईबाबांपैकी एक गॅलरीच्या कठड्यावर बसून त्याच्यावर पहारा करत होते...

दुसरे पिलूही बाजूला वार्‍याने हलणार्‍या झुडुपावर बसून तोल सांभाळत होते...

आईबाबांपैकी दुसरा त्याच्यावर लक्ष ठेवून होता...

जरा वेळाने आईबाबांनी जवळ जाऊन पोरांना ढुशा देत उडायला भाग पाडायला सुरुवात केली...

अधून मधून मोठ्ठा आ वासून पोरे आईबाबांकडे "भूक लागलीय, खाऊ द्या" अशी मागणी करत होती आणि ती पुरीही केली जात होती...

असे बराच वेळ चालले होते. काही वेळाने जेवणासाठी गेलो आणि नंतर काही कामात गुंतून गेलो. दुपारी उशीरा परत बघायला आलो तेव्हा ते सर्व कुटुंब उडून गेले होते. त्यानंतर ते आजपर्यंत परत दिसले नाही.

अश्या तर्‍हेने आमचे हे अनाहूत पाहुणे जसे अचानक आले तसेच अचानकपणे निघून गेले. त्यांचे घरटे मात्र आम्ही तसेच ठेवले आहे... पुढच्या वर्षी आले तर ते अनाहूत नसतील. कारण आमच्या घरातली त्यांनी बांधलेली जागा सर्वानुमते त्यांच्यासाठी राखीव ठेवलेली आहे !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक नंबर! फार मस्त फोटो आलेत पाहुण्यांचे! पिल्लांना उडताना गाईड करणाऱ्या बाबाचे expressions लाजवाब!
ते हालते फोटोज कसे काढले? GIF म्हणतात ते हेच का? सध्या फेसबूकवर storypick वै. वेबसाईटच्या लिंक्स येतात त्यात असे फोटोज असतात.

अतिशय सुंदर फोटो आलेत, खूपच छान... फोटोंबरोबर माहीतीही अगदी ओघवती झाली आहे. इतके जवळून मस्त फोटो आलेत...

फार गोडुले आहेत पाहुणे, फोटो तर अतिशय उत्तम आलेत.. जोडीला सुंदर लिखाण.. वाह!!

शेवटचा फोटो बघून वर्चुअल एम्प्टी नेस्ट सिंड्रोम अनुभवला Happy

मस्तच

अप्रतिम सुंदर फोटो आणि खुसखुशीत लेखन!! .... हे पाहुणे नेहेमी यावेत ही सदिच्छा!
काय आनंददायी अनुभव असतो नै हा! खरंतर मनातून वाटत असतं की या कुटुंबाला जवळ घेऊन बसावं, त्यांच्याशी काही गोड गोष्टी बोलाव्यात...त्यांच्या बाळांचं बेबी सिटिंग करावं.. त्यांचं सगळंच गोडुलं गोडुलं असतं.. Happy

अरे वा, मस्त पाहुणे, त्यांचे फोटो आणि वर्णन, सगळेच छान Happy
अंडी गायब होण्याचा अनुभव मी पण घेतलाय, फारच वाईट वाटलेलं तेव्हा. पण पुन्हा तुमच्यावर विश्वास ठेऊन परत अंडी घातली ( की आणली) हे की ती छान न Happy

red whiskered bulbul! वा भाग्यवान आहात इतक्या देखण्या पक्ष्याने तुमच्याकडे घरटं बांधलं. फोटो मस्त. अंडी ठिपक्या ठिपक्यांची छान दिसताहेत.

वॉव. खूपच भारी वाटले सगळे फोटो बघून.
रच्याकने ते हॅरी पॉटर पद्धतीचे हलते फोटो हल्ली सगळीकडे बघायला मिळतात ते खूप आवडतात..

अतीशय सुन्दर आणी मनमोहक. तुमचे मायबोलीवर स्वागत.:स्मित: आता घराच्या मागे दुसर्‍या सोसायटीमध्ये चार बुलबुल हवेत मस्त गिरक्या मारत होते. दोन तर नेहेमीच किचन समोर भिन्तीवर दिसतात.

मस्त लिहिलय Happy
फोटोज छान! माबो उघडल्या उघडल्या पहिला लेख हाच वाचला ते बरंच केलं Happy

त्या पहिल्या २ अंड्यांना त्यांचे आई बाबा कुठे आणी कसे उचलून घेऊन गेले असतील? का नवी अंडी घातली? पण तीही इतक्या लवकर? असं कसं झालं?

अरे वा मस्तच पाहुणे होते की. फोटो तर खुपच छान Happy माझ्याहीकडे कबुतराने पिल्ल घातली व छान चोचीमध्ये चोच घालूनी ...असा फोटो काढलाय .. अपलोडच होत नाहीये..

Pages