मागे एक मला न सुटलेले कोडे तुम्ही वाचले असेलच. आणि मग एका नवीन गोष्टीला सुरुवात झाली. मार्चचा शेवट आणि हे महाराज झोक्यावर बसून गोड गाऊ लागले. मैत्रिणीला बोलावू लागले.
मध्येच आत येऊन पाहणी करून गेले.
त्याला तर पटली जागा. आता मॅडम ना पटायला हवे होते. तो पुन्हा बाहेर गेला. अन येताना तिला घेऊनच आला. ती मात्र थेट आताच आली. झुंबरावर बसून नीट पाहणी केली, आत बसून पाहिले, दोन चारदा वर बसून उडून पाहिले, झुंबराच्या पक्के पणाची खात्री करून घेणे चालले होते तिचे.
मग ते दोघे टेरेसच्या बार वर बसून गुफ्तगू करू लागले. गोड आवाजात वेगवेगळी चर्चा त्यांनी केली. अन भुर्रकन उडून गेले... मी जुने घरटे जे धबधब्यावर ठेवले होते, ते उचलून झुम्बरावर ठेवले, विचार केली, त्यांना थोडी मदत
मग दुस-या दिवशी सकाळी सगळे आवरून विणायला बसले तर दोघे पुन्हा आले. आता ते मोकळे नव्हते , चोचीत काड्या घेऊनच आले. त्यांनी झुंबरा तल्या नव्या गोष्टीची पाहणी केली, पुन्हा भुर्रकन उडून बाहेर झोक्यावर बसले. मला वाटले, झाले, आपला आगाऊ पणा यांना पटला नाही की काय ?
पण परत दोघे आता आले. अन त्यांनी आपल्या चोचीतल्या काड्या तिथे ठेवल्या. अन नवीन आणायला परत बाहेर गेले दोघे.
मग काड्या आणून विणण्याचे काम सुरु झाले. त्याच वेळेस माझी बहिण आलेली. तिला ती सगळी गंमत दाखवली. मॅडम कशा माना वेळावून वेळावून काड्या एकमेकात विणतात ते बघताना मला म्हणाली, " वा छान, ती वर विणतेय तू खाली. तिची मान अन तुझा हात दोन्ही सारखेच तालात चाललेत बघ! "
तेव्हढ्यात तिच्या चोचीतले पान खाली पडले. आम्हाला न घाबरता ती वरतून खाली आली. खाली पडलेले पान उचलले आमच्याकडे एक कटाक्ष टाकला....
४ एप्रिल
आणि पुन्हा वर झुंबरा वर गेली. जणूकाही "कोण ही माझ्याशी बरोबरी करणारी ? " हे बघायलाच आली होती
हळूहळू घरटे आकार घेऊ लागले.
मग तिने त्यात बसून काही टोचतेय का याची पाहणी केली. त्याला ऑर्डर दिली. आणि त्याने जाऊन अजून काही पाने आणली.
आता मात्र मनाजोगते, मऊशार घरटे तयार झाले होते.
मग दोघे दोन दिवस फिरकलेच नाही. पुन्हा मनात धास्ती ... घरटे आवडले नाही की काय ?
पण मग तिस-या दिवशी ते दोघे परत आले. बाहेर बागेत बराच वेळ गुटर्गु चालले होते. पुन्हा उडून गेले. मग अजून दोन दिवसांनी मॅडम आल्या अन सरळ घरट्यात ठिय्या देऊन बसल्या. तो बाहेर झोक्यावर अन ही आत घरट्यात. तो आपला मधून मधून बाहेर जाऊन यायचा, बाहेरूनच तिला हवं नको विचारायचा. ती एखाद वेळेसच बाहेर जाऊन यायची.
मी दिवसभर हॉल किंवा स्वयंपाकघर इथेच असते. अन या दोन्हीत भिंत नसल्याने त्यांच्यावर मला छान लक्ष देता येत होते.... याचा पुढे तोटाही झाला, पण ते पुढे पाहू
अन मग एके दिवशी ती घरट्या ऐवजी झुम्बाराच्या कडे वर बसली, आत डोकावून चोचीने काहीतरी करू लागली. मला वाटले की एखादी काडी टोचतेय की काय तिला.... अन लख्खकन जाणवलं.... नाही ती अंडयाना हलवतेय . मला इतका आनंद झाला. पुन्हा एकदा माझीच कुस जणू उजवली
अन मग ती पुन्हा घरट्यात बसली.
अजून एक आठवडा गेला. तिने क्वचितच घरटे सोडले, अन तेही त्याच्या उपस्थितीत. दोघांपैकी एकजण घराच्याजवळ असेच. मला अंड्यांचे दर्शन काही घेता आले नाही.
अन मग एक दिवस सकाळी बारीक आवाज आला. दुपारची वेळ. आजूबाजूला शांत होते, आणि हा वेगळा आवाज वरून आलेला. मी चमकून बघितले तीने अगदी हलक्या आवाजात त्याला साद घातलेली. तोही पटकन उडून आत आला. दोघे अगदी नाजूक आवाजात काही बोलले. अन मग तो पुन्हा उडून बाहेर निघून गेला. थोडा वेळ ती पुन्हा घरट्यावर बसली. मग हळूच ती पण बाहेर गेली.
एव्हाना त्यांची मला चांगलीच ओळख झालेली. त्यांच्या हालचाली, त्यांचे बोलणे अगदी समजत नसले तरी त्यातील फरक कळू लागला होता. माझ्या लक्षात आले, बाळं बाहेर आलीत
तेव्हढ्यात दोघे आली. माझी मुह दिखाई राहिलीच.
दुस-या दिवशी सकाळी ती दोघे बाहेर पडली, आज मी तयारीत होते. पटकन शिडीवर चढले आणि अगदी हळूच डोकावले, अन एक क्षण मला समजलेच नाही. मी आपला मोबाईल क्लिक केला. अन चटकन खाली उतरले.
खाली येऊन बघितले तर ती उलूशी बाळं .... खूप घाई केल्याने फोटो हललाय पण अंदाज येईल. पण घाई केली ती बरी झाली. ती आलीच तेव्हढ्यात. मी चटकन आत गेले.
१६ एप्रिल
कित्ती गोंडस दिसत होते ते इवलाले जीव.आणि किती नाजूक..अलवार....
अखेर माझ्याकडे पिल्लांनी जन्म घेतला, मागचे कोडे सुटले नाही पण नवी गोष्ट घडत होती, अन मला ती पाहता, अनुभवता येत होती.
एक लक्षात आले की मी घरट्यापासून आता लांब रहायला हवं. पण त्यांची प्रगती पण पाहायची होती. फोटो काढणं आता शक्य नव्हतं. मग एक आयडीया केली. माझ्याकडे एक छोटा आरसा होता. तो एका मोठ्या काठीला फिक्स केला. अन ती दोघे नसताना ती काठी वर करून आरशातून पिल्लांना पाहू लागले.
आणि स्वयपाक घरात शिडी उभी करून ठेवली. आता पर्यंत मोबाईलनेच फोटो काढले होते . पण आता मोठा कॅमेरा ही तयारीत ठेवला. झूम लेन्सने जरी घरट्याच्या आतले दिसत नसले तरी घरट्याच्या वरती डोके काढले पिल्लांनी की दिसणार होते.
अन मग दुस-याच दिवशी ती संधी मला मिळाली.
१९ एप्रिल
ती बाहेर गेलेली अन अगदी उलुशी चोच बारीक आवाज करू लागली. लगेच ती आलीच आता चोचीत खाऊ घेऊनच . लगेच दुसरे पिल्लूही चोक वर करू लागेल. खरे तर अजून डोळे उघडले नव्हते त्यांचे, अंदाजानेच इकडे तिकडे करत होती. तिने बरोब्बर त्यांना भरवले.
आता मायबाप दोघांचे काम प्रचंड वाढले. दर १०-१० मिनिटांनी पिल्लांना भूक लागत होती. किडे, अळ्या, छोटी फलं, अगदी पूर्णान्न देत होते ते दोघे.
२१ एप्रिल
आणि पिल्ल आपली सदा भुकेली... सारखी आ वासलेली
ती पिल्लां भसाभस खात होती अन भसाभस मोठी पण होत होती. बुलाबुलाची इतकी टोकेरी चोच पण पिल्लांच्या त्या कोवळ्या, अलवार तोंडात जाताना कशी मऊ होत होती, लवचिक होत होती कोण जाणे.
पिल भराभर मोठी होत होती. अजून एक मला जाणवले. प्रत्येक वेळी घरट्यात येताना दोघे बुलबुल काही खायला घेऊन येत होते चोचीत . अन जाताना घरट्यातून काही घेऊनही जात होते. मला आधी लक्षात आले नाही, पण एकदा चुकून घरट्यातून खाली काही पडले. ती बाळाची शी होती. बुलबुल भरकन खाली आला, ती चोचीत घेतली अन बाहेर गेला. आपल्या घरट्याची स्वच्छता टिकवण्यासाठी पक्षी काय काय करतात, मी थक्क झाले पाहून !
पिल्लं भराभर मोठी होत होती. आता अंगावर पिसं ही आली. अन पंखात थोडे थोडे बळही येऊ लागले.
२६ एप्रिल
आई बाबा बाहेर गेले की ती त्यांची वाट बघू लागली.
आईबाबा आले की त्यांच्या देखरेखीखाली पंखातले बळ अजमावू लागली.
आईबाबा बाहेर गेले की नाजूक आवाजात त्यांना हाका मारू लागली.
दोघे एकटेच असले की एकमेकांना घट्ट बिलगून बसू लागली.
आणि मग २७ तारीख उजाडली. अतिशय वेगळा अनुभव मिळाला त्या दिवशी. सकाळी उठून बाहेर आले, म्हटलं बघुत पिल्ल काय म्हणताहेत तर नेहमी शांत असलेला बुलबुल भुर्रकन माझ्या अंगावर धाऊन आला. मला कळेचा ना काय झाले. मी पटकन मागे झाले. मग लक्षात आलं, हॉलच्या दारात पिल्लू आलेले. म्हणजे उडायला सुरुवात झाली तर
पण मग आमची त्रेधा तिरपीट होऊ लागली. आम्हाला ती दोघे हॉलमध्ये जाउच देईनात. जसजशी पिल इथे तिथे उडू लागली आम्हाला आमच्याच घरात फिरायची बंदी झाली. हॉलतर पूर्ण बंद झाला. पण हॉल आणि स्वयपाक घरात भिंत नसल्याने मी स्वयपाक घरात गेले तरी दोघे मला हुसकावू लागले. आता काय करायचं?
मला कळेना असं का होतय? कारण या पूर्वी चारदा चिमणीने आमच्याकडे घरटं केलेली, तिची बाळंतपण पण केलेली. अगदी पायात पायात यायची तिची पिल्लं, पण हा अनुभव कधीच आला नव्हता. कधीच चिमण्या अंगावर धावून आल्या नव्हत्या.
थोडा विचार केल्यावर लक्षात आलं, चिमणी ही कितीही झालं तरी माणसाळलेली, शहरी. पण बुलबुल रानटी पक्षि. तो शहरात आला खरा पण माणसाळलेला नाही तो. म्हणूनच बहुदा त्याला आपल्या पिल्लांना माणूस काही करेल असे वाटत असावे.
मग तो सारा दिवस स्वयंपाकाचा शॉर्टकट केला.
दुसरा दिवस अजूनच वाईट ठरला. आता पिल्ल स्वयंपाकघर आणि हॉलच्या मधल्या धक्क्यावर बसलेली. पण लगेचच बुलबुल त्यांना घेऊन टेरेस जवळच्या खुर्चीखाली घेऊन गेले. तिथून उडण्याचे प्रशिक्षण चालू झाले.
२८ एप्रिल
मग मला जरा धीर झाला अन फोटो काढला. पण माझी चाहूल लागताच तो पुन्हा सतर्क झाला.
मी पुन्हा मागे सरकले.बुलबुलला पिल्लांची प्रगती समाधानकारक वाटत होती. आता दोघे दोन्ही पिल्लांना घेऊन टेरेस मध्ये गेले. त्या आधी एक क्लिक मी केलेच.
अन मग तो दिवसभर टेरेस हे प्रशिक्षण केंद्र झाले. बिचारी माझी झाडं, एक दिवस पाण्यावाचून राहिली. मला काळजी वाटली, एक दिवस ठीक आहे पण यांचा मुक्काम वाटला तर माझी झाडं बिचारी सुकून जातील.
मला वाटलं रात्री पिल्ल घरट्यात येतील. पण नाहीच आली. दुस-यादिवशी बघितलं तर पिल्ल टेरेस मध्ये पण नव्हती. माझा त्यांचा इतकाच ऋणानुबंध असावा असा विचार करत मी मागे वळले. पण एक गोष्ट पूर्ण झाल्याचे समाधान मनात खूप दिवस रेंगाळत राहिले.
(काही फोटो मोबाईलने काढले आहेत अन छोट्या पिल्लांची चपळाई माझ्यात नसल्याने काही फोटो हलले आहेत. त्यामुळे फोटो काही तांत्रिकदृष्ट्या फार उत्तम नाहीत. पण त्या क्षणांना योग्य न्याय द्यायचा प्रयत्न जरूर केला आहे; तेव्हा तो गोड मानून घ्या )
पूर्वप्रकाशित : http://arati-aval.blogspot.in/2014/06/blog-post.html
वॉव !!! मस्तं वर्णन एकदम...
वॉव !!!
मस्तं वर्णन एकदम... सगळं असं लिहीलयं कि जणू काही माझ्यासमोरच घडतंय....
पण एक टायपो आहे बहुतेक.
अन पंखात थोडे थोडे बाळही येऊ लागले. >>>>>
बळही येऊ लागले. असं हवं ना तिथे ??
मस्त वर्णन, खुप आवडलं
मस्त वर्णन, खुप आवडलं
अर्जिता, हो ग हो... अगदी शब्द
अर्जिता, हो ग हो... अगदी शब्द न शब्द वाचलास की ग करते दुरुस्त, धन्यवाद ग
मागची गोष्ट हुरहुर लावणारी
मागची गोष्ट हुरहुर लावणारी होती, ही मस्त आहे. मजा आली वाचायला
मस्त! हे बुलबुल (रेड
मस्त! हे बुलबुल (रेड व्हिस्कर्ड बहुतेक) मला फार आवडतात. पण इथे दिसत नाहीत.
घरटं-अंडी-पिल्लं-पिल्लाचं ट्रेनिंग-पिल्लू उडून जाणं-घरटं रिकामं होणं ही सर्व प्रोसेस आम्हाला एप्रिलमध्ये पार्ल्यात शिफ्ट झाल्या झाल्या बघायला मिळाली. पण व्हाइट थ्रोटेड फॅनटेल या पक्ष्याची. खिडकीच्या बाहेर अगदी जवळच्या फांदीवर या जोडीने घरटं बांधलं वाटीसारखं. त्यात एकचं अंडं घातलं त्यांनी. या पक्ष्याची शीळ अ-त्यं-त मंजुळ असते. अगदी गाण्याची ओळच म्हणतो जणू.
वर्षा, हे फॅनटेल्स आमच्याही
वर्षा, हे फॅनटेल्स आमच्याही पार्ल्याच्या घरासमोरच्या झाडावर खूप येतात
हो फॅन्टेल्स खूप कॉमन आहेत
हो फॅन्टेल्स खूप कॉमन आहेत बहुतेक. मुलुंड पूर्वेलाही दिसायचे आम्हाला रोज. किंवा कदाचित झाडी जास्त असणार्या ठिकाणी सहज आढळत असतील.
वर्षा, हो ग. इथेही आहेत हे
वर्षा, हो ग. इथेही आहेत हे पक्षी. काय सुंदर पंखा उघडतात. आणि तू म्हणतेयस तसेच फार मंजूळ लकेर असते त्यांची.
हे बुलबुल पण फार सुंदर , वेगवेगळ्या लकेरी शिकवतात आपल्या पिल्लांना.
अप्रतिम लिहिलंय,
अप्रतिम लिहिलंय, अभिनंदन
पुलेशु हे ह्यासाठी की परत एक नविन जोडी तुमच्या घरी येवो आणि सुखासमाधानाने आपली वंशवेल वाढवो.......
अरे वा, मस्तंच गं
अरे वा, मस्तंच गं
सुंदर वर्णन आणि मस्त प्रचि.
सुंदर वर्णन आणि मस्त प्रचि.
या गोष्टी प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात पाहता येत नाहीत त्या गोष्टीं पाहण्याचा दुर्मिळ योग तुम्हाला मिळाला आणि ते सुध्दा शहरात खुप भाग्यवान आहात. तुमच्या चिकाटीला __/\__
भारीच एकदम! माझ्याकडून एक
भारीच एकदम!
माझ्याकडून एक झब्बू.
अवल.... अगदी आठवी-नववीची
अवल....
अगदी आठवी-नववीची हुजूरपागेत शिकणारी अवखळ मुलगीच होऊन तू इतकी रममाण झाली आहेस त्या बुलबुल जोडीसमवेत की जणू काही तू त्यांच्याच वंशातील होतीस गतजन्मी ! इतक्या मनोभावे सारे हर्षभरीत उतरले आहे तुझ्या बोटातून तर ते वाचताना मला वाटत होते की तू जे काही लिहित होतेस ते इतरांसाठी नव्हे तर स्वतः स्वतःशीच अगदी लाडीगोडीने जोडींचे नखरे आणि पिलांच्या चुळबूळीत गुंगून गेली होतीस.
फार सुंदर आहे हे चित्र....होय चित्रच....शब्द कमी आणि रंग अनेक....अगदी त्या रेड व्हिस्कर्डच्या अंगी फुललेल्या इन्द्रधनुष्यानुसारच. तुझ्याकडील जुने घरटे त्याना देवू केल्यावर त्यानी ते आपलेसे करताना दाखविलेली शंका नैसर्गिकच...तरीही त्यानी ते स्वीकारले यात त्यांचा मोठेपणा म्हणायचा की ज्या घरात आलो आहे आपण बाळांसाठी त्यांची इतकी चांगली सोय झाल्याचे पाहून बरेही वाटले असेल.....बाळांनी तर तुम्हा सर्वांचाच लळा लावणे तर उघडच आहे....बाकी झुंबर ते खुर्चीपर्यंतचा त्यांचा प्रवासही अनोख्यारितीने तू वर्णन केला आहेस.
बुलबुल जरी आता घर सोडून गेले असले तरी तुझ्याप्रती ती नक्कीच रघुनाथ पंडितांच्या एका कवितेमध्ये केलेल्या वर्णनाप्रमाणे आठवण ठेवेल....
"....किती रावे असतील तुझ्या धामी,
किती कोकिलही, सारिका, तशी मी.
चित्त लागियले तूझिया लगामी,
तू योजी मज आपुलिया कामी...."
धन्यवाद सर्वांना नलिनी, फारच
धन्यवाद सर्वांना
नलिनी, फारच सुंदर फोटो ग
मामा, तुमच्या शब्दांनी उभारी येते, अजून उत्साह येतो, खुप खुप धन्यवाद
अवल काय सुरेख लिहिलयस...
अवल काय सुरेख लिहिलयस... व्वा! वाचता वाचता अगदी रमुन गेले बघ आणि फोटोस पण कीती पेशन्सनी काढलेस.. खुप छान... आणि ती आरशाची आयडीया तर, शब्दच नाहीत....
खुप छान..
हा एक झब्बु माझ्या कडुन ही ...... :)
मस्त लिहलयं
मस्त लिहलयं
गोष्ट जशी घडली तशी इत्थंभूत
गोष्ट जशी घडली तशी इत्थंभूत इथवर आणलीत त्याखातर मन:पूर्वक धन्यवाद!
वर्णन, फोटो, कहाणी आणि पाहुणे सर्वच आवडले.
मस्त लिहिलंय.
मस्त लिहिलंय.
आपल्या ब्लॉग वर वाचलं होत
आपल्या ब्लॉग वर वाचलं होत तेंव्हाच खूप आवडलं होतं. आज परत वाचताना सुद्धा मस्त वाटलं .
अवल मनाने तर मोठी आहेसच, पण
अवल मनाने तर मोठी आहेसच, पण तेवढीच भाग्यवान आहेस. कदाचीत मनाचा मोठेपणा हे तुला भरभरुन देत असावा.
खूप छान वाटले फोटो पाहुन आणी कहाणी वाचुन.:स्मित:
किती मस्त लिहिलं आहेस.
किती मस्त लिहिलं आहेस. बर्याच जणाना माहेर पुरवतेस.
धन्यवाद सर्वांना गोळे काका
धन्यवाद सर्वांना
गोळे काका
आर्च "माहेर "
फार छान! मजा आली वाचायला!
फार छान! मजा आली वाचायला!
आवडेश ग
आवडेश ग
निसर्ग घरातच अवतरला की, लकी
निसर्ग घरातच अवतरला की, लकी आहात तुम्ही. मस्त वाटले वाचुन.
मस्तच! माझ्या लेकाला फार
मस्तच! माझ्या लेकाला फार आवडले!
अवल, कित्ती मज्जा आली
अवल, कित्ती मज्जा आली वाचताना. खुपच छान निरिक्षण आणि अगदी बारकाईनं केलेलं वर्णन वाचताना रंगून गेले.
आधीचा अनुभव चुटपुट लावून गेला खरा, पण यावेळी बुलबुल कुटुम्बानं तुम्हाला आपलं समजलं हां.
तुझं आणि जागूचं झुम्बर खुप
तुझं आणि जागूचं झुम्बर खुप सारखं आहे. तुमच्या दोघींची अन मिसेस बुलबुलांची आवड सारखीच दिसते.
मस्त लिहिलयं.
मस्त लिहिलयं.
khup chhaan... paxyaanee
khup chhaan... paxyaanee ghar aapale maaanle mhaNaayache.. aataa daravarShee hakkaane yeNaar !
Pages