मनात अंधार कोंडला मी विझल्यासारखे काही
उजेड मग आत येत गेला दिसल्यासारखे काही
बळेच मग दाखवीत सोबत असल्यासारखे काही
असून असतात सोबतीला नसल्यासारखे काही
वळून ती काल छान पाहत होती सारखे मागे
असेल उरले बरेच ओळख असल्यासारखे काही
कथा कुणाची व्यथा कुणाची मी ऐकली एवढी सारी
अशाकशाने मनात झाले भिजल्यासारखे काही
बरेच केले मला समृद्ध सुखांनी अन दुःखानी ही
मेलो जर आज , वाटते पण जगल्यासारखे काही
विलास खाडे
पुन्हा जीवा तीच आस
पुन्हा मनी तोची ध्यास
ओढ पंढरीची खास
या आषाढी पावलास
झिरपलं पाणी रानी
ओल तव पाझरोणी
तृण बहरासी आलं
रोमरोम झकांरलं
वर सावळी सावली
संगती तुका, माऊली
अंतरी विठू कल्लोळ
वाटेलागी संतमेळ
तुझा दूत हा पवन
त्यानं धरियले बोट
वाट सरे फुलावाणी
नाही पावलाशी कष्ट
सुर्यदेवाच्या रथाला
अश्व भावाचा जोडला
पर्वत अडी नडीचा
पार लिलया म्या केला
विठू अनंता व्यापून
परी विरक्ती अंतरी
सजे तनमन भरजरी
आगळे रितेपण ऊरी
आल्या सया आखाड सरी
त्यांचे रोमांच अंगभरी
अशी भिजू भिजू निघाली
पंढरीच्या वाटेवरी वारी
ओल दिंड्या पताकात
ओल दाटे काळजात
अवघा रंगही एक येथ
दीठी माऊली चराचरात
मनोमनी एक धून
मनोमनी एक छंद
ठाई ठाई पांडुरंग
ऐसा एकची अभंग
© दत्तात्रय साळुंके
प्रपाताने थेंबुट्यास
कमी कधी लेखू नये
पिंडी वसते ब्रह्मांड
कदापि विसरू नये
महापुरात लव्हाळी
वाचतील? खात्री नाही
लवचिकतेचा ताठा
लव्हाळ्याने धरू नये
आरशाने आरशात
प्रतिबिंब पाहू नये
अनंताने कोंदटसे
सान्तपण लेवू नये
कवितेचा शब्द शब्द
ओळ बनण्याच्या आधी
दोन ओळींच्या मधल्या
अनाघ्राता स्पर्शू नये
जुने थांबे आता कसे आणायचे?
या पावसाचे गाणे कसे गायचे
अजून राहिले पुरते भिजायचे
इंद्रधनूसवे मनातले काही असे
शब्द अक्षर पुन्हा गिरवायचे
काही प्रवासी थांबलेले जरी इथे
काही ओथंबलेले तसे असायचे
वाटेतली जुनी झाडे उभी तिथे
पालवीचे नवे वस्त्र ते नेसायचे
थांबायचे, पहायचे की बोलायचे
की पुढे पुढे तसेच जात राहायचे
जुने थांबे आता कसे आणायचे
या पावसाचे गाणे कुणी गायचे
© चंद्रहास शास्त्री
जटिलाच्या दारावरती
दुर्बोध देतसे थाप
भेटता उमजले दोघा,
"उभयतांस एकच शाप
सद्दीत सुमारांच्या ह्या
उ:शाप नसे शापाला
अस्वस्थ युगाची हाक
ऐकू ना येई कुणाला"
दुर्बोध जटिलसे हसले
दुर्बोधून जटिलही गेले
अन् विषण्ण होऊनी दोघे
शोधार्थ कवीच्या गेले
होतं असं, चुकतं काही
फसतं गणित, सुटत नाही
पुन्हा पुसून गिरव पाटी
नव्याने मांड अंक लिपी
हातचे नीट मिळवून बघ
ऋण, धन निरखून बघ
सुटत जाईल हळूहळू
तुझे तुलाच लागेल कळू
चुकणं म्हणजे, विराम निव्वळ
तो ही स्वल्पच, पूर्ण नाही
चुकलं तरी हरकत नाही
फार काही बिघडत नाही
नभिचा प्रभाकर
कधी डोळे वटारून
जाळ ओकतो
कधी गुलाबी थंडीत
शेकोटी पेटवतो
कधी ढगांच्या मस्तीत
लपाछपी खेळतो
कधी चंद्र कवेत घेऊन
पृथ्वीला वाकुल्या दावतो
कधी पूर्वेला फेकून नजर
लालभडक शेंदूर फेकतो
सायंकाळी दर्याला लपेटून
नजराणा पेश करतो
सृष्टीचा असा हा ताबेदार
आपणावर तयाचे अनंत उपकार
प्रा.महेश बिऱ्हाडे
पेझारी रायगड
नभिचा प्रभाकर
कधी डोळे वटारून
जाळ ओकतो
कधी गुलाबी थंडीत
शेकोटी पेटवतो
कधी ढगांच्या मस्तीत
लपाछपी खेळतो
कधी चंद्र कवेत घेऊन
पृथ्वीला वाकुल्या दावतो
कधी पूर्वेला फेकून नजर
लालभडक शेंदूर फेकतो
सायंकाळी दर्याला लपेटून
नजराणा पेश करतो
सृष्टीचा असा हा ताबेदार
आपणावर तयाचे अनंत उपकार
प्रा.महेश बिऱ्हाडे
पेझारी रायगड
गुलाबी*
सुर निखळले नाद गुलाबी
नकोस घालू साद गुलाबी...
शपथा वचने गुंतत जाणे
कुरतडतो उन्माद गुलाबी...
घाव रेशमी जपले; फसलो
छळती जखमा…वाद गुलाबी...
फुलोर गळला उन्मळलो मी-
कसला मग संवाद गुलाबी...
क्षतविक्षत मी भिंगुळवाणा
पांघरतो तुझी याद गुलाबी...
द्वाड आठवाची वसंत बाधा
मानगुटीवर ब्याद गुलाबी...
मैफलीत बहु रडलो आणिक-
पडल्या टाळ्या दाद गुलाबी..!
***
(* गझल सदृश्य कविता)