मी छाटल्या ठिकाणी उमलून आज आलो
ग्रीष्मातला बहावा होऊन आज आलो
चांभारचौकश्यांना चकवून आज आलो
कुप्रश्न धाडसाचे उठवून आज आलो
वेड्यांमुखी प्रशंसा वदवून आज आलो
हेटाळणीस त्यांच्या टाळून आज आलो
जे लागले जिव्हारी लपवून आज आलो
मौनात संयमाला सजवून आज आलो
चिंता - नव्हे - चितांना फसवून आज आलो
माया अशाश्वताची सोडून आज आलो
- मंदार.
बरं झालं मी छक्का झालो !
या अख्या भारतात...
एकदा टाळ्या वाजवत फिरेन म्हणतो
दोन चार राज्यात राहून
तिथली उग्र, हलकट माणसे पाहून
परत पुण्यात येऊन पी एच डी करेन म्हणतो...!
ट्राफिक, दुकाने, रस्त्या-रस्त्यावर
शाळा आणि कॉलेज मध्ये
जाऊन लहान मोठ्यांना आशीर्वाद देईन म्हणतो...!
“मनपाच्या पुलावर”, “बुधवार पेठेतल्या”
येणार्या जाणाऱ्या वेश्या मला पाहून
रात्री क्षणभर थबकून, सुस्कारत म्हणतील...
बरं झालं हा छक्का झाला !
उगाच वासनांध “पुरुष” होण्यापेक्षा..!
कठीण असतं सांत्वन करणं
आणि त्याहूनही कठीण असतं,
सांत्वन स्विकारणं
दु:खाचा तळ काठावरुन दिसत नाही
सांत्वन असलं सच्चं, तरी तेही तळ गाठत नाही
आणि दु:खाचा डोह शोषता येईल,
अशी जादू मलाही येत नाही
मी फक्त मिठी मारेन तुला
काठावर बसून राहीन तुझ्या बाजूला
दु:खाच्या डोहाची खोली तुला घाबरवेल
तेव्हा मी मूक सोबत करेन
पण अजिबात म्हणणार नाही
I can feel your pain
कारण कितीही सहवेदना म्हंटले
तरी त्या दु:खाचा प्रत्येक पापुद्रा
फक्त तुलाच समजणार
काठावरुन मला कितीसा उमजणार?
हाडं गोठवणारा गार वारा
वर वांझोट्या ढगांची गर्दी
कधी ऊन कधी सावली
तिच ती अंग जाळणारी सावली
पाऊस पेरणी करून गेला
परत फिरकलाच नाही
भुईतला आशेचा कोंब
गर्भातच मेला
आता उरलेत
दुष्काळाचे पायरव
आढं मोडकी कणाहीन घरं
मुकाट सुन्या सुन्या वाटा,पार
तहानलेले पाणवठे , विहिरी
मूक हंबरणारे
शेणामुताच्या वासाला आसुसलेले गोठे
आ वासलेल्या रिकाम्या गव्हाणी
गोठ्याकडं डोळे लावलेल्या चारा छावण्या
जोगीण
तुझ्यासवेे सदैव हासते भास तुझ्या जगण्याचे
तुझ्या खांद्यावरी रुदते पाश तुझ्या नसण्याचे
आठवांचे ठरते चांदणे अश्रू डोहात अजूनही
उशाशी थिजते रात्र न मालवते दीप चूकूनही
हृदय फुलांचे गुंंफतो गजरा परंतु सुवास कोरा
जूनी उसवते वीण, नाही तुझ्यापास सुई दोरा
विसरणे विसरुनी गेले जखडलेली प्रीत बेडी
स्नेहगुणाची न मूर्ती होते ठाऊक नव्हत्या रुढी
ना भेटते नित्य दिवसापरी पाहते तुला आरश्यात
पानात सुर्य डोकावतो परी तू हरवला कवडश्यात
शेल्याचा ना धरिला शेव चूकलासे वाट आपसूक
तान्ह्या बाळासम दिल्या हाका अखेर झाले मूक
चंद्राची धग क्षीण होत सरता
घेरून ये गारवा
रात्रीचा तम प्राशुनी घुमतसे
वृक्षातळी पारवा
तेजाचे ऋण फेडण्यास भटके
तार्यांसवे काजवा
जीर्णाचे अवशेष येथ कुठले
उन्मेष जेथे नवा
प्रज्ञेचे स्थल-काल अक्ष हटता
भोवंडल्या नेणिवा
अस्ताचे भय भास्करास कुठले
जो जाणिवांचा दिवा
वयाच्या त्या एका टप्प्यावर
जेव्हा लागते आयुष्य उतरणीला
व्यवहारी जगही लागते आता
तुम्हाला सोईस्कर विसरायला
मी वाट पहात असतो, कुणा
भेटीची सखा, आप्तेष्टांची
अशात फोन खणखणतो
कुणी तरी अनाहूत असतो
मोहरते माझे विद्ध मन
धन्य झाला आज दिन
कुणातरी यावी आठवण
क्रेडिट कार्ड घ्या कॉलर म्हणं
म्हणे वार्षिक शुल्क नाही काही
आहे अॅडऑन कार्ड बायकोलाही
मी उत्तरलो
ही ऑफर घेऊ कुणासाठी
आता कुणीही नाही पाठी
आधाराचे चार शब्दही दुरापास्त
हीच रे बाबा माझी ऐपत
दिशा पेटती पेटता रान सारे
उडे धूळ वाऱ्यावरी पांढरी
गळू लागता दूर आकाश तारे
कसा सापडावा किनारा तरी
कुणी राख केली कुणाच्या घराची
कसा दोष देऊ कुणाला इथे
उरी दाबला खोल आकांत सारा
तरी थंड भीती मनाला डसे
नको हाक मारू कुणाला अवेळी
कुणाला नको दाखवू आरसे
नको माग घेऊ कुणाचा कुठेही
नको नाचवू पावलांचे ठसे
द्वैत
कवी ग्रेस (माणिक गोडघाटे) यांच्या सुंदर व आशयघन कवितेवर केलेले मी विडंबन...हे गीत महाश्वेता या मालिकेचे शीर्षक गीत होते....(ही पापे मी कुठे फेडणार आहे देव जाणे)
पाहिले तुला असे कुणास ना उमजले
रुप भाबडे तुझे मनास या भावले
जायचे कुठे मला विसरलो ते आता
मागुती तुझ्याच ही चालतात पावले
बोललीस मधुर ते हळुवार बोल चार
काळजात सप्तसूर तार तार वाजले
माळलास वेणीत तोडुनी गुलाब एक
भाग्य केव्हढे पहा त्या फुलास लाभले
आस घेऊनी उभा वाट पाहतो किती
भेटशील तू कधी युग सरून चालले