दिवा

Submitted by अनन्त्_यात्री on 22 September, 2024 - 08:08

चंद्राची धग क्षीण होत सरता
घेरून ये गारवा
रात्रीचा तम प्राशुनी घुमतसे
वृक्षातळी पारवा

तेजाचे ऋण फेडण्यास भटके
तार्‍यांसवे काजवा
जीर्णाचे अवशेष येथ कुठले
उन्मेष जेथे नवा

प्रज्ञेचे स्थल-काल अक्ष हटता
भोवंडल्या नेणिवा
अस्ताचे भय भास्करास कुठले
जो जाणिवांचा दिवा

Group content visibility: 
Use group defaults

अप्रतिम!

शार्दूलविक्रीडीत उत्तम सांभाळले.

काजवा ही ओळ अफाट झाली आहे.

शेवटचे कडवे हाय क्लास!