तुझ्या अबोल्याचा...

Submitted by मनोजकुमार देशमुख on 26 May, 2023 - 12:32

तुझ्या अबोल्याचा किती त्रास झाला
घरात होतो तरी वनवास झाला?

क्षण निरोपाचे होते जीवघेणे
सुरु परदेशी जसा प्रवास झाला

अबोली अंगणात बहरून आली
अजाणता तुझा तो सहवास झाला

तिथे माळलास तू गजरा कदाचित
अंतरात माझ्या हा सुवास झाला

तू तोडलास बांध मौनाचा तुझ्या
उरात मोकळा माझा श्वास झाला

Group content visibility: 
Use group defaults

छान.
गडकर्‍यांची अश्या आशयाची एक कविता आहे. नाव आठवत नाही. (हां आठवले - कुणी कोडे माझे उकलिल का?)

'गुलाब माझ्या हृद्यी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला,
काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या ऊरी कोमल का?
मद्याचा मी प्यालो प्याला, प्रिये तयाचा मद तुज आला ...

कविची प्रेयसी विचारते की - तुम्ही तर शास्त्रज्ञ म्हणवता मग मला सांगा - पश्चिमेला सूर्य मावळताना, पूर्वा का रंगते? त्यावर कवि उत्तर देतात - अश्या आशयाची ....
मी तुझे चुंबन घेतले तर दोन्ही गाल कसे रंगतात वगैरे..

सॉरी मी २ कवितांची मिसळ केली. -

रंग गुलाबी संध्या पसरी पश्चिम दिग्भागीं,
समोर पूर्वा स्वमुख रंगवी त्याच रम्य रंगीं.

परी पशिच्माहृदयिं तांबडें सूर्यबिंब विलसे,
कशी रंगली पूर्वा याचें कारण कांहिं नसे.

विनोदचतुरा मुग्धा बाला विचारि निज नाथा,
"शास्त्रज्ञा, पंडिता, उलगडा हें कोडें आतां !

अपरा वदनीं रमते लाली रविसहवासानें,
रवि नसतां परि कां रंगावें प्राचीच्या वदनें ?

रंग इकडचा तिकडे वठला, छटा कुठुनि गेली ?
ही जादूची नजरबंदि कुणिं कधीं कशी केली ?"

विनोदपंडित पति कौतुकला, हंसे तसा थोडें;
ओठ गुलाबी, गाल गुलाबी, गुलाबीच कोडें !

वदे तिला, "हें रहस्य असलें कथीन कानांत !"
करि कंठीं कर एक, दुज्यानें धरि दुसरा हात !

ओढुनि जवळी, ऐकविला तिस मुकाच कानांत,
---गालावरचें गीत कसें तें वठवूं गानांत !

दूर सरकतां लज्जित बाला, प्राणनाथ बोले
"बघ हृदयाच्या आरशांत जें चित्र तुझें डोले !

रविबिंबासम चुंबन-बिंबचि विलसत या गालीं !
सहज तयाची छटा गुलाबी पसरे भंवतालीं.

चुंबनचित्र न परी उमटतां या दुसर्‍या गालीं,
सांग वल्लभे ! नाचतसे कां त्यावरिं ही लाली !

रंग इकडचा तिकडे वठला, छटा कुठुनि गेली ?
ही जादूची नजरबंदि कुणिं कधीं कशी केली ?"

"कांठयानें काढावा कांटा", शास्त्रज्ञा ठावें,
गुलाब टाकुनि गुलाबास मग कां नच उडवावें ?

हीं हृदयाचीं कोडीं सोडवि हृदयांचा मेळ,
शास्त्रांना हा कसा कळावा हृदयाचा खेळ !

ओठगोष्ट मग कशीं बोललीं तीं मिटलीं तोंडें,
’गोविंदाग्रज’ रसिकां टाकी गुलाबीच कोडें !