आवडलं असतं मला..
तुझ्या स्वप्नांच्या दुनियेत जगायला
आवडलं असतं..तुझा चंद्र व्हायला
आवडलं असतं..
जर मीच असते तुझ्या हृदयात
कलेकलेने वाढणारं प्रेमसुद्धा
आणि दुराव्यातला विरहसुद्धा..
आवडलं असतं..
जर दोन्हीचं कारण मीच असते
आणि तसं तू म्हणाला असतास
असंख्य नक्षत्र ताऱ्यांना विसरुन..
मलाच शोधत हरवला असतास
तर आवडलं असतं मला.. हरवायला
आवडलं असतं..तुझा चंद्र व्हायला
शोधतो आहे जुने झुरणे कुठे आता!!
ते तुझे माझे खुळे जगणे कुठे आता!!
चांदणे येते उशाशी चंद्र मधु झरतो
रेशमी स्पर्शासवे जळणे कुठे आता!!
कोवळी पाती तृणाची सर्द एकांती
नाचरे चाळे तुझे पळणे कुठे आता!!
बोलती लाटा मुक्याने ऐकतो सारे
बोलक्या डोळ्यात ते दिसणे कुठे आता!!
बरसता धारा गरजते ना तसे अंबर
हात हाती, चिंब ते भिजणे कुठे आता!!
ते तुझे नखरे किती रुसणे किती हसणे
ती मिठी तो स्पर्श ते छळणे कुठे आता!!
कोंडला वारा नभाने चोरले चंद्रा
धुंद त्या रात्री तसे फुलणे कुठे आता!!
वृत्तः राधा
मी मानसी
कोलाहलाच्या काठाशी
जरी झालो सैरभैर
अनाहताची नि:शब्द
साद देते मला धीर
क्षणोक्षणी लाट येते
विकराळ वास्तवाची
पण भुलवी गंभीर
गाज कालप्रवाहाची
डोळे दिपले कधीचे
झगझगत्या दिव्यांनी
खुणविते त्यातूनही
एक दूरची चांदणी
बलदंड सखा तो तिचा
रांगडा तयाचा बाणा
विसावली बाहूपाशात
आश्वस्त अवखळ ललना
का कोण जाणे बिनसले
कर्णपिशाच्च काही वदले
मिठी सैल तयाची झाली
अन सागरलाट दूरावली
काडीमोडच घेते म्हणाली
थयथयाट तिनं मांडला
कातळावर विराट फुटता
वदे हा ही कठोर निघाला
मग बदलली तिनं दिशा
परी दशा बदलली नाही
मऊशार वाळू किनारीही
भक्कम आधारच नाही
जे दिसले वरकरणी तिज
कुठे भक्कम,मुलायम जरी
निराधार, खिन्न मनाने
ती परतली जुन्या घरी
सकाळी पाच वाजता दिवस हिचा सुरु होतो..
सत्यवानाच्या डब्यासाठी,कुकर शिट्या मारतो..
सकाळची असतें लगबग,मुलाची शाळेची तयारी..
सात पन्नासची लोकल,पकडायची तिला घाई..
वटपौर्णिमा आज जरी, नाही इथे वड पूजेला..
पुजून चित्रातल्या झाडाला, सण करते ती साजरा..
पौराणिक कथेत येतो यम, घेण्या सत्यवानचे प्राण..
शतपुत्रांचे वरदान मागून, वाचविते ते सावित्री हुशार..
सत्यवान सावित्री दोन्ही, संसार रथाची चाके दोन..
एक चाक जर निखळले, कसा चालेल हा संसार?..
सांज थांबता दारात
तुझे आठवती बोल
शब्द शब्द सुगंधित
काय अत्तराचे मोल?
दरवळे दरवळ
माझी लवते पापणी
हुरहुर अनिवार
झुरे शुक्राची चांदणी
सांज ढळता ढळता
रात्र उलगडे अशी
होते कावरी बावरी
प्रीत जागते उशाशी
घेते मिटून पापणी
तुझी लागते चाहूल
जरा जडावता डोळे
पांघरते प्रीतभूल
तुझ्या भेटीचे अत्तर
रोज परिमळे इथे
नको विचारुस कधी
"माझी आठवण येते??"
मी मानसी
तू चुकली की मी,हा निव्वळ बनाव होता
मान्य करूया, संवादांचा अभाव होता
माहित आहे, बोलून जातो न रुचणारे
ठाऊक आहे? मौनाशीही लगाव होता?
तुझा मनामधे जी दलदल, तिच्या तळाशी
...एके काळी किती देखणा तलाव होता
आस सोडली, हट्ट सोडला तू असण्याचा
मला असाही तू नसण्याचा सराव होता
जिथे नेईल रस्ता त्या दिशेने जायचे होते
जिथे नेईल रस्ता त्या दिशेने जायचे होते
लकेरीसारखे कोठेतरी उमटायचे होते
नको देऊ नशा आता इथे रेंगाळण्यासाठी
मला घोटात एका जीवनाला प्यायचे होते
जरी ओढून नेई लाट पायाखालची वाळू
कळेना पावलांना का तिथे थांबायचे होते
धुळीची वादळे आली धुळीची वादळे गेली
मला माझ्यातले माझे असे राखायचे होते
कवडसा एक सोनेरी कधी हातांस स्पर्शावा
मलाही दीप मातीचे पुन्हा उजळायचे होते
तुझ्यामाझ्यातले काही नको सांगूस कोणाला
तुला बहरायचे होते मला वेचायचे होते
द्वैत
युग सरले आज एक
भेटशील काय तू ?
बोल ते लाडकेच
बोलशील काय तू ?
बोलताना हळुवार
हात हाती घेऊनिया
सवे सोबतीत माझ्या
चालशील काय तू ?
चालताना खोडीचा त्या
फुकाच येऊनी राग
एकटीच अशी मागे
थांबशील काय तू ?
थांबल्या स्मृतीचे मोती
कोंडले ते शिंपल्यात
शिंपले ते अलगत
खोलशील काय तू ?
खोलताना शिंपले ते
ओसंडलीत आसवे
आसवे माझी तुझी
पुसशील काय तू?
आसवांचे पुसणे ते
कल्पनाच ही जरी
कल्पनेतली खरी
भेटशील काय तू ?
आज मी तुज पाहिले चांदण्यात न्हाताना
चंद्रास पार ओघळून जाताना
कमनीय किनाऱ्यावरी तुझ्या फेन तरंग फुटताना
माड रोमावळीचे अंगावरी शहारताना
भागल्या रश्मीस एकदा भाळावरी टेकताना
आरुणी ओठांवरी तिन्हीसांज होताना
ओल्या पावलात माझी एकेक रात्र भिजताना
तुझ्या तंद्रीत माझा उभा जन्म भोगताना
©निखिल मोडक