सकाळी पाच वाजता दिवस हिचा सुरु होतो..
सत्यवानाच्या डब्यासाठी,कुकर शिट्या मारतो..
सकाळची असतें लगबग,मुलाची शाळेची तयारी..
सात पन्नासची लोकल,पकडायची तिला घाई..
वटपौर्णिमा आज जरी, नाही इथे वड पूजेला..
पुजून चित्रातल्या झाडाला, सण करते ती साजरा..
पौराणिक कथेत येतो यम, घेण्या सत्यवानचे प्राण..
शतपुत्रांचे वरदान मागून, वाचविते ते सावित्री हुशार..
सत्यवान सावित्री दोन्ही, संसार रथाची चाके दोन..
एक चाक जर निखळले, कसा चालेल हा संसार?..
व्रत म्हणजे नाही उपास,नाही प्रदक्षिणा वडास..
प्रेम, विश्वास, अन समर्पण, हाची अर्थ या व्रतास..
भाग्यवान सर्व सत्यवान, ज्यांच्या जीवनात सावित्री..
व्रतात व्हा सर्व सहभागी, रक्षणा सदैव प्राण तिचेही..
काळ जाता.. मुले मोठी, बांधतात पिलांसाठी घरटी..
सर्वार्थाने निवृत्त झाले आता , सत्यवान आणि सावित्री..
जीवनाची तरी ओढ ,या जीवनी सुटता सुटेना..
न्यायाचे तर ने एकावेळी,विनंती दोघांची यमाला..
✍️हेमंत नाईक
.... हेमंत नाईक
14.06.2022