आजोळ

Submitted by अनन्त्_यात्री on 21 May, 2023 - 07:39

आज पहाटे पहाटे
ओलांडून स्थळकाळ
साकारले माझ्यापुढे
बालपणीचे आजोळ

मामा मावशी प्रेमळ
हात आजीचा सढळ
आजोबांच्या भूपाळीत
उगवतीचे आभाळ

पेरू फणसाच्या मधे
कृष्णकमळीचा वेल
पायरहाटाच्या मागे
धरे सावली पोफळ

कधी पारावर गप्पा
कधी बालिश भांडणे
रात्री चांदण्या मोजत
अंगणातले झोपणे

कधी नदीत डुंबणे
कधी नांगर धरणे
करवंदे तोडताना
काटे बोथटून जाणे

तान्ह्या पाडसांची शिंगे
चाचपडून बघणे
आठवडी बाजारात
निरुद्देश भटकणे

पारंब्यांचे उंच झोके
खो-खो लगोरीचा खेळ
झाडाखाली रांधलेली
खास पंचरंगी भेळ

वाढे वैशाखी उन्हाळा
नदीपात्र नाला होई
आणि बघता बघता
सुट्टी संपूनच जाई

पडवीतला झोपाळा
झुलायचा गाण्यांवर
गाणी तीच म्हणताना
आज स्वर का कातर?

अजून त्या सुट्टीतला
भेटे मीच कधी मला
गळा दाटे-खंत वाटे
काळ का नाही गोठला?

गोटा नदीपात्रातला
जपलाय मी जादूचा
घासून तो उघडतो
खजिना मी आजोळचा

आरपार कोरडा मी
शहराच्या निबिडात
आजोळाच्या आठवाने
ढग दाटे पापण्यांत

पापण्यातल्या ढगाची
कड चंदेरी सोनेरी
बरसती आठवांच्या
आज सरीवर सरी

Group content visibility: 
Use group defaults