कृष्णमंजिरी
दिवसभर केलेल्या
तडजोडी, व्यवहार...
सगळ्याची पुटं
चढत रहातात त्याच्यावर.
लोकांची पापं स्वत:वर घेत
त्यांना आशिर्वाद देत
तो सगळा राप
स्वत:वर चढू देतो
भक्ताला आश्वस्त करत
सगळे शाप लेवत जातो
स्वत:वर
अन मग दुसऱ्या दिवशी
सचैल स्नानाने शुचिर्भूत होऊन
पुन्हा उभा रहातो कृष्ण,
....... दर्शनासाठी!