उंच मनोरे कोसळताना
उंच मनोरे कोसळताना
क्षितिज सरकते सावध मागे
लाट उसळते काठावरती
अन खडकांना करते जागे
निळ्याजांभळ्या कल्लोळातून
प्रवासपक्षी परतून येतो
पिवळ्या पानांचा पाचोळा
वाऱ्यावरती उडू पाहतो
वाट पुसटशी दुरून बघते
ओल्या वाळूचे हळवेपण
आणि किनारा मिटून डोळे
कसा मुक्याने खचतो कणकण
सूत्र कोणते सांगत नाही
दुःख कुणाचे कुणास सलते
गिळून अश्रूंच्या पागोळ्या
दंवभाराने पाते हलते
द्वैत