भेट

Submitted by किरण कुमार on 6 March, 2023 - 11:12

(वृत्त - मालिनी , अक्षरगणवृत्त ,१५ अक्षरे , गण - न न म य य,
यती ८ व्या अक्षरावर )

सजल नयन झाले पाहताना तुला मी
अधर अधिर होते पत्कराया गुलामी
भरभर कर माझे चुंबताना जराशी
थरथर मन हे का खेटताना उराशी

प्रहर उलटला तो पांघरोनी नभाला
अवखळ रजनी ही येतसे स्वागताला
सहज हसत तेंव्हा तू मिठी मारताना
नितळ दगड झालो प्रेम हे पेलताना

बिलगुन बस आता मागणे फार नाही
वचन शपथ मिथ्या अंतरीचे बोल काही
शितल पवन येई प्रेम हे पेटवाया
सृजन समय आला आपुली भेट व्हाया

- किरण कुमार

Group content visibility: 
Use group defaults