श्रीतुकयाबंधू - श्रीकान्होबा
दिसेचिना बंधुराज
कान्हो विचारीत जना
दिसला का तुम्हा कोठे
बंधु तुकोबा सांगाना !
पिंपुरणी वृक्षातळी
पाहे तुळशीची माळ
वीणा सतत जवळी
तुका हातीचे ते टाळ
तारा वीणेच्या झुकल्या
टाळ पडे अस्ताव्यस्त
माळ तुळशीची पडे
धुळीमाजी ती अस्वस्थ
पाही कान्होबा निश्चळ
गाली कोरडा ओघळ
काय केलेसी विठ्ठला
डोई नुरले आभाळ
डोह इंद्रायणी स्थिर
नुठे एकही तरंग
पान उडूनी एकुटे
कान्हा पुढ्यात अभंग
गाथा गारुड
ठसे नितळ शब्दांचे
मनावर अलगद
त्याचे गारुड आगळे
आत आत सावळत
इंद्रायणी डोहावाणी
शब्द गंभीर सखोल
लाटा हलके उठत
नाम बोलत विठ्ठल
पिंपुरणी रुखातळी
गार साऊली संतत
ओढ वाटते जीवाला
सुख ह्रदी सामावत
भाव शब्दींचा ह्रदयी
क्षणी जरा उतरत
विटेवरी जो ठाकला
बाहू येई पसरीत....
श्वासाश्वासावर चाले
पांडुरंग जपमाळ
रोमारोमातूनि स्फुरे
एक विठ्ठल केवळ
गाथा शब्दाशब्दातून
राम कृष्ण हरी सूर
वीणेवर उमटतो
पांडुरंगाचा झंकार
कधी आर्त कधी जाब
कधी गाळी कधी लीन
शब्द होते आवरण
भाव वाही ओथंबून
थांग लागेना भक्तीचा
इंद्रायणी खुळावली
ह्रदयात सांभाळोनी
गाथा शिरी धरीयेली
काही वर्णना होईना
शब्दी बांधू कसा भाव
ठेवी पायापाशी स्वामी
अंतर्यामी हीच हाव
.............................
गाळी ...... शिवी गाळी